सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यात लढत होणार आहे. यासाठी दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. यादरम्यान, राम सातपुते यांची सोशल मीडियावर बदनामी करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरातील काँग्रेस कार्यकर्ते राज सलगर यांच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर राम सातपुते आणि भाजपाविरोधात मिम्स वायरल करण्यात आले. त्यामुळे बदनामी झाल्याचा आरोप करत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपाचे कार्यकर्ते समर्थ बंडे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कलम ५०० आणि ५०१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सोलापुरात उमेदवारांचा प्रचारही वेगाने सुरु आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही आपापले प्रचार करत आहे. प्रचारादरम्यान उमेदवार एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहे. अशातच हे मिम्स व्हायरल झाल्यानंतर सोलापुरातील राजकीय वातावरण तापले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात मे महिन्यात मतदान होणार आहे. ७ तारखेला मतदान पार पडणार आहे.