सोलापूर : वीज जोडणीची रक्कम भरून घेतल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी कनेक्शन देऊन त्रुटीयुक्त सेवा दिल्याबद्दल मानसिक त्रासापोटी ५ हजार रुपये तर खर्चापोटी २ हजार रुपये ग्राहकाला द्यावेत, असे आदेश जिल्हा ग्राहक न्याय मंचाने महावितरण कंपनीला दिले आहेत़ याबाबत टेंभुर्णीतील महिला ग्राहक जयश्री माळी यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती़ याबाबत अधिक माहिती अशी, १७ आॅक्टोबर २००९ रोजी माळी यांनी महावितरणकडे रक्कम भरून वीज जोडणी मागितली होती़ मात्र महावितरणने रक्कम भरून घेतल्यानंतर चक्क तीन वर्षांनंतर वीज जोडणी दिली़ याबरोबरच फॉल्टीमीटर बसवून त्रुटीयुक्त सेवा दिली़ त्यानंतर देयक भरण्यासाठी तगादा लावून वीज पुरवठा खंडित केला़ यावेळी माळी यांनी जिल्हा ग्राहक न्याय मंचात त्रुटीयुक्त सेवा दिल्याबद्दल, वीज पुरवठा खंडित करु नये, असा अर्ज केला़ यावर सुनावणी होऊन तक्रारदाराने २००९ पासून आकारलेले वीज आकार देयक रद्द करण्याचे आदेश दिले़ तसेच २००९ पासून देयक सरासरी स्वतंत्र देयक आकारणीचे आदेश दिले़ तेव्हापासून भरलेली रक्कम ही समायोजित करून मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्यापोटी ५ हजार रुपये तर खर्चापोटी २ हजार रुपये देण्याचे आदेश दिले़ या प्रकरणात ग्राहकाच्या वतीने अॅड़ वामनराव कुलकर्णी, अॅड़ पंकज कुलकर्णी तर महावितरणच्या वतीने अॅड़ एस़ एस़ कालेकर यांनी काम पाहिले़
-----------------------------------
ग्राहकांना दिलासा
महावितरणकडून ग्राहकांना नीट सेवा मिळत नाही. कधी जादा बिल तर कधी वीज न वापरताही मोठे बिल असे प्रकार काही नवीन नाहीत. मात्र वीजजोडणीचे पैसे भरूनही वीज न देणार्या महावितरण कंपनीला या निकालाने चपराक तर बसली आहे. शिवाय ग्राहकांना दिलासाही मिळाला.