सोलापूर : मागील तीन वर्षांपासून सुरू असलेला पथदर्शी प्रकल्प बंद केल्यामुळे वडाळा ग्रामीण रुग्णालयातील महिलांच्या बाळंतपणातील शस्त्रक्रियाही (सिझर) तीन महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे आता ग्रामीण रुग्णालयात केवळ ड्रेसिंग व थंडी-तापाच्या गोळ्या मिळत आहेत.
उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे ग्रामीण रुग्णालयाची सुविधा असली तरी तेथे रुग्णांवर म्हणावे तितके उपचार होत नाहीत. ग्रामीण रुग्णालयात पथदर्शी प्रकल्पातून महिलांची साधारण प्रसूती, सिझर केले जात होते. याशिवाय बालरोगतज्ज्ञ डाॅक्टरची नेमणूक असल्याने दिवसभर लहान मुलांची तपासणी व उपचार केले जात होते. मात्र हा पथदर्शी प्रकल्प जून महिन्यापासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तीन महिन्यात एकही बाळंतपण सिझर शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. आता महिलांना सोलापूरला जावे लागते.
याशिवाय बालरोगतज्ज्ञ डाॅक्टरही नाही
पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षकांची येथे नेमणूक नाही. शिवाय आहे त्या प्रभारी अधीक्षकांचे नियंत्रण नसल्याने कर्मचाऱ्यांच्या सोयीने ग्रामीण रुग्णालय सुरू आहे. सध्या रुग्णालयात केवळ ड्रेसिंग व थंडीतापाच्या आजारावरील गोळ्या देण्याची सोय आहे. याबाबत सिव्हिल सर्जन प्रदीप ढेले यांच्याशी संपर्क साधला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.
----
0 स्त्रीरोगतज्ज्ञ अमोल सुरतकल, भूलतज्ज्ञ दिनेश रसाळ व बालरोग तज्ज्ञ सूरज साठे हे या माता-बालसंगोपन पथदर्शी प्रकल्पाचे काम पाहत होते. मात्र सिव्हिल सर्जन यांनी हा प्रकल्प बंद केल्यामुळे वडाळा येथील ग्रामीण रुग्णालयातील बाळंतपणाची शस्त्रक्रिया बंद झाली आहे.
0 कधी कधी एका महिन्यात १७ सिझर होत होते तर दर महिन्याला सरासरी दहा बाळंतपण होत होत्या.