सोलापूर : विठू नामाच्या जयघोषाने पंढरी नगरी दुमदुमून गेली असून, आषाढीनिमित्त पवित्र स्नानाची पर्वणी साधण्यासाठी चंद्रभागा नदीचा तीर वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला. पंढरपुरात जणू भक्तीचा महापूर आला आहे. आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेनंतर विठ्ठल मंदिर परिसरात संत तुकाराम महाराज की जय... संत ज्ञानेश्वर महाराज की जय... माऊली माऊली चा जयघोष सुरु झाला.
दरम्यान, पंढरपुरातील मठ, मंदिरे आणि धर्मशाळांमधून विठू नामाचा जयघोष सुरू आहे. टाळ, मृदुंगाच्या गजराने पंढरीचा आसमंत दणाणून गेला आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून बारा लाखाहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. सावळ्या विठुरायाच्या दर्शनाचा आस लागलेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर दर्शन घेताना आनंद ओसंडून वाहत आहे.
पंढरपुरात आज आषाढी एकादशीमुळे भक्तिमय वातावरण आहे. पंढरपुरातील सर्व रस्ते वारकऱ्यांनी फुलून गेले आहेत. पददर्शन व मुखदर्शनासाठी हजारो वारकरी रांगेत उभे आहेत. दर्शनासाठी एका भाविकाला अठरा ते वीस तास लागत आहेत. पंढरपूरात आज भक्तीचा मळा फुलला आहे.