टेंभुर्णी येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे २००८ ते २०२० या कालावधीतील चेअरमन, सचिव व या संस्थेमार्फत चालवण्यात येणाऱ्या जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक या सगळ्यांनी संगनमत करून शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश डावलून १२ वर्षापासून सागर भागवत राजगुरू यांच्या मागणीनुसार अनुकंपा तत्वावर शिपाई पदावर नियुक्ती न केल्याबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या आदेशान्वये टेंभुर्णी पोलीस ठाण्यात १२ जानेवारी रोजी शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी चेअरमन पी. आर. सुतार, सुभाष मेथा, सुभाष चव्हान, औदुंबर महामुनी तसेच माजी सचिव संतोष पाटी, विद्यमान सचिव विलास राजमाने, माजी मुख्याध्यापक गंगाधर उबाळे, जवाहर मेथा, डी. के. देशमुख, एच. एम. तांबोळी व विद्यमान मुख्याध्यापक प्रमोद भोसले यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदला आहे, परंतु आरोपींना अद्याप अटक केली नाही.
त्यामुळे त्या सर्वांना तातडीने अटक करण्याची मागणी टेंभुर्णी येथील मागासवर्गीय संघटनांनी पोलीस अधीक्षक व विशेष पोलीस महानिरीक्षक, नागरी हक्क संरक्षक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे केली आहे.
चौकशीच्या नावाखाली होत नाही अटक
निवेदनात म्हटले, गुन्हा दाखल झालेले आरोपी अटक न झाल्याने ते टेंभुर्णीत फिरत आहेत. नागरी हक्क संरक्षण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी या प्रकरणाची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन ही परत चौकशीचे नावाखाली आरोपींना अटक केली जात नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे.