बार्शी : चारे परिसरातील पिंपळवाडी, शिराळे, पाथरी, धानोरे, कुसळंब, घारी, पुरी या गावांतील ग्रामस्थांसाठी पांगरी आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाची सोय करावी, अशी मागणी बार्शी पंचायत समितीचे गटनेते सुंदरराव जगदाळे यांनी केली.
सध्या आरोग्य विभागाने ६० वर्षांवरील व कोमॉर्बिड असणाऱ्या ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरणाची सुरुवात केली आहे; पण वरील गावांतील नागरिकांना ही लस सध्या फक्त चिखर्डे आरोग्य केंद्रात उपलब्ध आहे. लस घेण्यासाठी तेथे जाणे गैरसोयीचे आहे. हे अंतर देखील लांब आहे.
पिंपळवाडी-चिखर्डे हे अंतर ४० किमी आहे. तेच पांगरी आरोग्य केंद्र हाकेच्या अंतरावर आहे. अशीच काहीशी परिस्थिती इतरही गावांची आहे. या सर्व गावांतील नागरिकांना पांगरी आरोग्य केंद्र मध्यवर्ती ठिकाणी आहे. ग्रामस्थ आठवडी बाजार, शेतीसाठी लागणारे अवजारे, खते, बियाणे, कीटकनाशके व इतर प्रापंचिक वस्तू खरेदीसाठी पांगरी येत असतात; पण या आरोग्य केंद्रात सोय नसल्याने लस घेणे गैरसोयीचे झाले आहे. संबंधितांनी पांगरी आरोग्य केंद्रात लसीकरणाची सोय करावी, अशी मागणी गटनेते जगदाळे यांनी केली. सध्या परिसरात आगळगाव व चिखर्डे आरोग्य केंद्रात लसीकरणाची सोय आहे. पांगरी आरोग्य केंद्र वरील दोन्ही आरोग्य केंद्रांपेक्षा जुने व सोयीचे आहे.