भीमानगर : सध्या महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस लोकसंख्येच्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार बबनराव शिंदे यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
सध्या सोलापूर जिल्हा रेड झोनमध्ये आहे. मागील काही दिवसापासून जिल्ह्यात लसीचा तुटवडा आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. लस घेतलेल्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. जिल्ह्याची लोकसंख्या आणि उपलब्ध लसीची मात्रा यात तफावत असल्याने लसीकरण घटले आहे.
पुणे महसुली विभागात लोकसंख्येनुसार दुसऱ्या क्रमांकावर (४३ लक्ष) असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यास पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्याच्या तुलनेत लसींचा पुरवठा कमी असल्याचे आमदार बबनदादा शिंदे व आमदार संजयमामा शिंदे यांनी मागील आठवड्यात आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री राजेश टोपे यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
---
पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करण्यासाठी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी पुणे विभागाच्या आरोग्य उपसंचालक अर्चना पाटील यांना सूचना दिल्या आहेत. लसीचा पुरवठा सुरळीत होण्यास काही प्रमाणात मदत होईल.
- बबनराव शिंदे
आमदार, माढा