बार्शी : नांदेड जिल्ह्यात बिलोली येथे मागासवर्गीय अल्पवयीन मूकबधिर मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आलेल्या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी बार्शीतील मागासवर्गीय संघटनांनी करीत अण्णा भाऊ साठे चौकात निदर्शने करत घटनेचा निषेध नोंदवला.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष नवनाथ चांदणे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. पीडितेच्या कुटुंबाला राज्य शासनाने २५ लाखांची आर्थिक मदत देऊन नातेवाइकास तत्काळ शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी बहुजन मुकी मोर्चाचे तानाजी बोकेफोडे यांनी केली आहे. यावेळी तानाजी ठोंबरे, शिवसेनेचे शहरप्रमुख दीपक आंधळकर, राजेंद्र गायकवाड, शिवसेनेच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष सुनीता जाधव, बहुजन वंचित आघाडीचे विवेक गजशिव यांनी निषेधाच्या घोषणा देत निदर्शने केली.
या आंदोलनात नगरसेवक अमोल चव्हाण, संदेश काकडे, किरण तौर, संदीप आलाट, निलेश खुडे, सत्यजित खलसे, ओंकार पेटाडे, वैभव काकडे, नाथा मोहिते, दलित स्वयंसेवक संघांचे राजेंद्र कसबे, शंकर वाघमारे, दया कदम, निलेश मस्के, रिपाइं आठवले गटाचे अध्यक्ष ॲड. अविनाश गायकवाड, वसीम पठाण, आनंद चांदणे, योगेश लोंढे, अजय चव्हाण करण खंडागळे, योगेश कांबळे, रोहित अवघडे सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांची भेट घेऊन निवेदन दिले.
फोटो : १५ बार्शी स्ट्राईक
बिलोली प्रकरणातील आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी निदर्शने करताना दलित महासंघाचे कार्यकर्ते.