माळशिरस : तालुक्यातील खासगी हॉस्पिटलच्या मनमानी कारभाराबाबत आरोग्य व महसूल प्रशासनाच्या कारभाराची शासकीय चौकशी करण्यासाठी पंचायत समितीचे सदस्य व विरोधी पक्षनेते अजय सकट यांनी प्रांत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.
तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रांत, तहसील व आरोग्य प्रशासन सर्वसामान्यांची दखल घेत नसल्याचा आरोप होत आहे. हेल्पलाईन सुरू केले मात्र; हॉस्पिटल, बेड उपलब्ध होत नाही. रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण करून काळा बाजार केला जात आहे. प्रशासनातील दोषी अधिकारी व डॉक्टरांवर तत्काळ कारवाई करावी. हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे बिल आकारणी होत नाही. प्रांत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करून नायब तहसीलदार यु. आर. देसाई व वरिष्ठ लिपिक कारंडे यांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे, माजी उपसरपंच डॉ. तुकाराम ठवरे, जब्बार मुलाणी, रवी वाघमारे यांनी पाठिंबा दिला.
---
फोटो : १९ माळशिरस
एकदिवसीय लाक्षणिक उपोषणानंतर मागणीचे निवेदन देताना.