सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेती मशागतीची कामे सुरू आहेत, नांगरणे, मोगडणे यासाठी ट्रॅक्ट्ररशिवाय पर्याय नाही तसेच काही शेतकऱ्यांना पावसाळ्यात होणारे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शेतातून चाऱ्या काढणे, ताली टाकणे यासाठी जेसीबीशिवाय प्रयाय नाही. त्यामुळे ट्रॅक्टर व जेसीबीसाठी शेतकऱ्यांना डिझेल अत्यंत आवश्यक आहे.
पेट्रोलपंपावर डिझेलसाठी ट्रॅक्ट्रर किंवा जेसीबी घेऊन जाणे परवडणारे नसल्याने शेतकरी मोटारसायकलला ड्रम बांधून पंपावर जात आहेत. मात्र पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्याचा मार सहन करावा लागत आहे.
पावसाळा तोंडावर असल्याने शेती मशागतीची कामे खोळंबली तर शेतकऱ्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागणार आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांनी शेतकऱ्यांना शेती कामासाठी डिझेल देण्याची सवलत द्यावी, अशी मागणी युवा सेना तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.
-----