मोडनिंब : वरवडे (ता. माढा) येथे कोविड सेंटर चालू करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे ॲड. बाळासाहेब पाटील यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी व आरोग्य विभागाने याची तत्काळ दखल घेऊन वरवडे टोलनाका जवळील मंगल कार्यालयात हे सेंटर चालू करावे अशी मागणी पाटील यांनी केली आहे. मागील काही दिवसांपासून वरवडे परिसरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेकजण घरी उपचार घेत आहेत. मात्र काही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन झाले. जर शासनाने कोविड सेंटर सुरू केले तर त्याचा संसर्ग आटोक्यात आणण्यास मदत होणार आहे. या सेंटरमुळे वरवडे, अरण, तुळशी, भेंड, पडसाळी, परिते, परिते वाडी, आहेरगाव, अकुंबे, भोईंजे, होळ, उजनी या भागातील बाधित रुग्णांना दिलासा मिळणार आहे. हे कार्यालय कोरोना केंद्राला देण्याची मालक गायकवाड यांनी तयारी ठेवली आहे. गायकवाड यांचे दोन मंगल कार्यालय असून याठिकाणी लोकवस्ती नाही. वीज व पाण्याची सोय आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे मी ती कार्यालय कोविड सेंटरसाठी देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
---
मोडनिंबच्या केंद्रावर गैरसाेय
सध्या मोडनिंब येथे एक सेंटर पंधरा दिवसांपासून सुरू आहे. या केंद्रावर आज जवळपास ५० रुग्ण उपचार घेत आहेत. सर्व रुग्णांसाठी दोनच शौचालय व स्नानगृह दोन आहेत. त्यामुळे या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. कार्यालय मालक चंद्रकांत गिड्डे यांनी वरिष्ठांकडे लेखी निवेदनाद्वारे हे सेंटर बंद करण्याची मागणी केली आहे.