करमाळा : तालुक्यात सध्या हिंस्र प्राण्याचा वावर वाढलेला आहे. अनेक जनावरे आणि माणसांवरील हल्ल्यानंतर शेतकऱ्यांच्या जीविताला धोका उद् भवत असून, रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरतभाऊ आवताडे यांनी करमाळा महावितरण कंपनीच्या उपअभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
करमाळा तालुक्यातील रावगाव येथील फुंदेवाडीत कल्याण फुंदे या तरुण शेतकऱ्यावर रात्री हिंस्र प्राण्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ज्वारीला पाणी देणारे फुंदे यांचा निष्पाप बळी गेला. या घटनेनंतर करमाळा तालुक्यातील शेतकरी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या रात्री ज्वारीला पाणी द्यावे लागत आहे. शेतकऱ्यांना स्वत:चा जीव धोक्यात घालून पाणी द्यावे लागत आहे. दिवसा वीजपुरवठा नसल्याने रात्रीच पाणी द्यावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला. वीजपुरवठ्याबाबत योग्य नियोजन करून दिवसा वीजपुरवठा करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आवताडे यांनी दिला आहे.