करमाळा : येथील उपजिल्हा रुग्णालयात रोज येणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसींची संख्या दररोज जाहीर करावी. तसेच लस घेण्यासाठी नोंदणी केलेल्या लोकांना पूर्व सूचना देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ॲड. सविता शिंदे यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डाॅ. अमोल डुकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे कोरोनाची लस घेण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे; परंतु लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे तत्पूर्वी नोंदणी केलेल्या लोकांनाही मिळत नाही. रुग्णालय परिसरात रोज ३००-४०० लोक गर्दी करताहेत. त्यामुळे करोना नियमांची पायमल्ली होत आहे. तसेच करोना संसर्गाचाही धोका वाढत आहे. वयोवृद्धांना तासनतास रांगेत थांबूनही लस मिळत नाही. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्येक दिवशी किती लस उपलब्ध होते याबाबत रुग्णालय प्रशासनाने दररोज माहिती जाहीर करावी, अशी मागणी ॲड. सविता शिंदे म्हणाल्या.