सांगोला : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. या प्रकरणामुळे राज्याची बदनामी झाली असून, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा. या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी सांगोला तालुका भाजपच्यावतीने जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात अनेक धक्कादायक खुलासे आणि आरोप केले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हप्ते वसुलीमुळे राज्यातील पोलिसांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. जगात दोन नंबरवर असलेल्या मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न गृहमंत्र्यांनी केला आहे. भ्रष्ट सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांचा त्वरित राजीनामा घ्यावा व या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख व तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
यावेळी तहसीलदार अभिजीत पाटील यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, शहराध्यक्ष आनंद फाटे, नवनाथ पवार, मानस कमलापूरकर, प्रवीण जानकर, ओंकार कुलकर्णी, दीपक केदार, राहुल केदार, बिरा शिंगाडे, सिद्धेश्वर गाडे, समाधान केदार, नंदू मेटकरी, शरद गावडे आदी यावेळी उपस्थित होते.