सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरी टेक्स्टाईल इंडस्ट्री सध्या ठप्प आहे. लॉकडाऊनच्या दोन महिन्यानंतर देशभरातील हॉस्पिटलकडून सोलापुरी टॉवेल, चादरी आणि बेडशीटची मोठी मागणी येत आहे. सोलापुरातील टेक्स्टाईल कारखाने बंद असल्याने मागणीनुसार पुरवठा होईना. काही कारखानदारांनी मनपाची परवानगी घेऊन ‘स्टे इन’ च्या धर्तीवर उत्पादन सुरू केले. पण यंत्रमाग कामगार कारखान्यात थांबायला तयार नाहीत, त्यामुळे पुन्हा सुरू झालेले कारखाने बंद झालेत. ‘स्टे इन’ ची अट रद्द करा, अशी मागणी कारखानदारांकडून होत आहे.
सोलापुरातील टेक्स्टाईल इंडस्ट्री बंद असल्याने जवळपास पन्नास हजार कामगार घरीच बसून आहेत. एक हजारांहून अधिक कारखाने बंद आहेत. औद्योगिक वसाहती सुरु करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील कारखानदारांनी मनपा प्रशासनाकडे कारखाने सुरू करण्यासंदर्भात निवेदन दिले. बहुतांश टेक्स्टाईल कारखानदारांनी आॅनलाईन अर्ज देखील दाखल केले. प्रशासनाकडून ‘स्टे इन’ ची अट घालण्यात आली आहे.
कारखान्यात काम करणारे कामगार कारखान्यातच रहावेत. ते घरी जाऊ नयेत, अशी अट प्रशासनाने घातली आहे. काही कारखानदारांनी कामगारांना कारखान्यात ठेवून घेण्याची तयारी दर्शवली, पण यास कामगारांनी नकार दिला आहे. कारखान्यात थांबण्याची कामगारांची मानसिकता नाही, त्यामुळे कामगारांना ये-जा करण्याकरिता पासेस द्यावेत, अशी मागणी देखील टेक्स्टाईल कारखानदारांकडून झाली आहे. यास मनपा प्रशासन तसेच पोलीस आयुक्त कार्यालयाने साफ नकार दिला आहे. टेक्स्टाईल कारखाने सुरू करण्यात अडचणी येत आहेत, अशी माहिती सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी ‘लोकमत’ला दिली.
...तर अर्थव्यवस्थेला फटका !- देशभरातील मोठे हॉस्पिटल सध्या सुरू आहेत. अशा हॉस्पिटलकडून सोलापुरी टॉवेल, चादरी आणि बेडशीटची मागणी येत आहे. काही प्रशासकीय अडथळ्यामुळे आम्हाला कारखाने सुरू करता येईनात. त्यामुळे हॉस्पिटलकडून होत असलेली मागणी पूर्ण करता येईना. या मागणीतून दोन महिन्यानंतर टेक्स्टाईल इंडस्ट्रीला एक आशेचा किरण दिसतोय. या संधीचा वापरही आम्हाला करता येईना. दुसºया जिल्ह्यातील तसेच राज्यातील कारखाने मोठ्या प्रमाणात सुरू होत आहेत. सोलापुरात आज घडीला कारखाने सुरू नाही झाल्यास कारखानदार हवालदिल होतील. सोलापुरी अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल. प्रशासनाने याकडे विशेष लक्ष देऊन टेक्स्टाईल कारखानदारांच्या अडचणी सोडवाव्यात, अशी मागणी सोलापुरातील प्रसिद्ध उद्योजक काशिनाथ गड्डम यांनी केली आहे.