कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये एस.टी.सह रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. लॉकडाऊन हळूहळू कमी केल्यानंतर एस.टी. सेवा पूर्ववत करण्यात आली असून, रेल्वे सेवा मात्र ग्रामीण भागात अद्याप सुरू झालेली नाही. करमाळा तालुक्यातील जेऊर हे सोलापूर-मुंबई रेल्वे मार्गावरील स्टेशन आहे. करमाळा, जामखेड, कर्जत, आष्टी या भागातील प्रवासी जेऊर येथून रेल्वेने मुुंबई, पुणे व सोलापूरकडे प्रवास करतात. जेऊर रेल्वेस्टेशनवर सध्या सिद्धेश्वर व हैदराबाद या दोनच रेल्वे गाड्या थांबतात; पण त्या गाड्यांना रिझर्व्हेशन असल्याशिवाय प्रवेश नाही. इंद्रायणी, पुणे-सोलापूर व सोलापूर-पुणे पॅसेंजर, विजापूर - मुंबई व मुंबई-विजापूर पॅसेंजर, पंढरपूर- मुंबई व मुंबई-पंढरपूर पॅसेंजर, पुणे-अमरावती व साईनगर शिर्डी या सर्वच रेल्वेच्या फेऱ्या अद्याप सुरू झाल्या नाहीत. यामुळे प्रवाशांना एस.टी. बस व खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
---
व्यावसायिक अडचणीत..
रेल्वे स्टेशनवर गाड्या थांबत नसल्याने किरकोळ व्यावसायिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याशिवाय अपंग व भिकारी यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एस.टी.चा प्रवास महाग व कंटाळवाणा आहे. शिवाय रेल्वेचे प्रवास भाडे एस.टी. च्या तुलनेत फारच कमी असून, आरामदायक प्रवास होत असल्याने प्रवाशांचा कल रेल्वेकडे आहे. रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवासी फारुक जमादार यांनी केली आहे.