कुर्डूवाडी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दीड वर्षांपासून ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद आहेत. त्यामुळे शेतात पिकविल्या जाणाऱ्या पालेभाज्या, फळभाज्या ह्या कुठे विकायच्या हा शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर या आठवडी बाजारावर अवलंबून असणारे छोट्या व्यावसायिकांचाही उदरनिर्वाह आठवडी बाजारावर अवलंबून आहे. तोही बदच आहे. आर्थिक घसरणीचा विचार करता आठवडा बाजारसह इतर बाजार सुरू करावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे झेडपीचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, ग्रामीण भागातील आठवडी बाजारात शेतीपूरक व्यवसायाची उलाढाल मोठ्या प्रमाणात आहे. बाजार बंद असल्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची जनावरे आणि कोंबडी, अंडी यांचाही आठवडी बाजार बंद आहे. यांचा व्यापार करणारे शेतकरी व व्यापारी यांच्या शेतीमालाला व जनावरांना योग्य किंमत मिळत नाही. महागाईमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक राजकीय कार्यक्रम, लग्न, समारंभ, अनेक प्रकारचे व्यवसाय, दुकाने, सलून दुकाने, दारू दुकाने यांना परवानगी दिली आहे. मात्र, गेली दीड वर्षे ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. बस व रेल्वेसेवाही सुरू झाल्या आहेत. सध्या ग्रामीण भागातील सर्व दुकाने ही सकाळी ७ ते ४ या वेळेत सुरू आहेत. ग्रामीण भागातील आठवडी बाजारा त्वरित सुरू करून छोट्या व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.