मोहोळ : येथील ग्रामीण रुग्णालयातील सुविधा व ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा, ग्रामीण भागातील नागरिकांना ऑफलाईन पद्धतीने लसीकरण करावे आणि मोहोळ येथे सुरू करण्यात आलेल्या शासकीय डेडीकेट कोविड सेंटरमधे बेड आहेत; परंतु त्या ठिकाणी प्रशिक्षित कर्मचारी कमी आहे. त्याची पूर्तता करावी अशी मागणी भाजपचे खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे बैठकीत केली.
यावेळी तातडीने ऑफलाईन लसीकरण चालू केले जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिल्याची माहिती भाजपचे नगरसेवक सुशील क्षीरसागर यांनी दिली. नुकतेच खासदार जय सिद्धेश्वर महाराज यांनी मोहोळ ग्रामीण रुग्णालयास भेट दिली होती. त्यावेळेस नागरिकांनी मोहोळ ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय व्हावे, अशी मागणी केली होती. या मागणीनुसार खासदारांनी ही बैठक लावली होती. याबाबत जिल्हाधिकारी यांनी तातडीने आरोग्य विभागप्रमुख यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व या प्रस्तावाच्या बाबत सर्व माहिती घेतली.
अगामी काळात शासनदरबारी जाऊन हा प्रस्ताव मंजूर करून घेतो, असे खासदार सिद्धेश्वर महाराज यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, भाजपाचे तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण, नगरसेवक सुशील क्षीरसागर, मुजिप मुजावर, सागर लेंगरे उपस्थित होते.
---
१८ मोहोळ
मोहोळ ग्रामीण रुग्णालयासंदर्भात जिल्हाधिकांऱ्यांसमवेत चर्चा करताना खा. डाॅ. जयसिद्धेश्वर महाराज.
----