सांगोला : वाळु उपसा करण्यासाठी ५० हजार रूपयाची खंडणी मागितल्याच्या कारणावरून धाडस संघटनेचे शरद कोळी यांच्यावर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण पोलीसांनी याप्रकरणी धाडस संघटनेचे शरद कोळी, जिल्हाध्यक्ष प्रदीप जाधव यांच्यासह सिध्देश्वर यादव, कुबेर मंडले या चौघांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
कोरडा नदीतून बेकायदेशीर वाळू उचल्याच्या मोबदल्यात आमच्यातर्फे धाडस संघटनेचे शरद कोळी यांना ५० हजार रुपयाचा हप्ता द्यावा लागेल अन्यथा हप्ता दिला नाही तर अध्यक्ष तहसीलदारांना सांगून तुमची वाट लावतील़ पोलीस व महसूल खाते त्यांना घाबरते़ सर्वजण त्यांना हप्ते देतात म्हणून तर त्यांच्या अंगावर किती सोनं आहे, बघितले का अशी दमदाटी करीत हप्ता देण्यास विरोध केल्याने सोनंद (ता. सांगोला) येथील धाडस संघटनेच्या सहा ते सात जणांनी मिळून दोघांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना गुरुवार २३ रोजी रात्री आठच्या सुमारास सांगोला -सोनंद रोडवरील यादव वस्तीवर घडली.
याबाबत सोनंद (ता. सांगोला) येथील ऋषीराज सतीश बाबर यांनी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार पोलिसांनी धाडस संघटनेचे शरद कोळी (रा. अर्धनारी ता. मोहोळ), सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रदीप जाधव (रा. जुनोनी ता. मंगळवेढा), सोनंद शाखेचे सिद्धेश्वर यादव, कुबेर मंडले, मारुती मंडले, अश्विनी यादव सर्वजण (रा. सोनंद ता. सांगोला), लक्ष्मण कोळी व परशु कोळी (दोघेही रा. उमदी ता. जत जि. सांगली) यांच्यासह सात ते आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास सपोनि प्रशांत हुले करीत आहेत.
याप्रकरणी धाडस संघटनेचे शरद कोळी, जिल्हाध्यक्ष प्रदीप जाधव यांच्यासह सिध्देश्वर यादव, कुबेर मंडले या चौघांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. चौघांना दुपारी सांगोला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी दिली.