टेंभुर्णी : येथील पोलीस स्टेशनच्या संरक्षक भिंतीच्या कडेला राहणाऱ्या कुटुंबातील महिला व पुरुष यांना पोलीस ठाण्यात बोलावून जबरदस्तीने आवारातील मानवी विष्ठा उचलावयास लावल्याची दखल घेत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी चौकशी करून दोन दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र, या आश्वासनाला दिवस उलटून गेले तरी संबंधितांवर गुन्हा दाखल न केल्यामुळे तक्रारदार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळपासून टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन चालू केले आहे.
या प्रकरणाची दखल घेत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी रविवारी टेंभुर्णी पोलीस ठाण्याला भेट देऊन अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांची चौकशी समिती नेमली. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवस ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली होती. सर्व पुरावे देऊनही पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे व संबंधित पोलीस कर्मचारी यांच्यावर तीन दिवस उलटून गेले तरी गुन्हे दाखल न केल्यामुळे संघटनांनी बुधवारपासून टेंभुर्णी पोलीस स्टेशनसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.
या आंदोलनात मातंग एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे महासचिव विशाल नवगिरे, राहुल चव्हाण, दलित स्वयंसेवक संघाचे अनिल जगताप, भीम क्रांती मोर्चाचे महावीर वजाळे, लहुजी शक्ती सेनाचे जिल्हाध्यक्ष अनिल आरडे, माढा तालुका अल्पसंख्याक कमिटीचे अध्यक्ष रफिक शेख, ॲड. तुकाराम राऊत, क्रांतिकारी संघर्ष सेनेचे गणेश भोसले, विजय कदम, अमोल भोसले, मोहन कांबळे, राहुल कांबळे, धनंजय जगताप सहभागी झाले.
----
समाज कल्याण सहायक आयुक्त धावले
सोलापूरचे समाज कल्याण सहायक आयुक्त कैलास आडे यांनी टेंभुर्णी येथील आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याबाबत ते आजच्या आज जिल्हाधिकारी व समाज कल्याण पुण्याचे आयुक्त यांना अहवाल सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
---
फोटो : ०२ टेंभुर्णी
धरणे आंदोलनास बसलेले विविध संघटनांचे पदाधिकारी