सांगोला तालुक्यातील ६१ पैकी पाच ग्रामपंचायतींसह १९ गावातील ६९ सदस्य बिनविरोध झाले होते. तर ५६ ग्रामपंचायतींच्या ५३९ जागांच्या निवडणुकीसाठी प्रचार सुरू होता. गेल्या नऊ दिवसांपासून शेकाप, आरपीआय आघाडी, पॅनल व शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- काँग्रेस (आय) यांच्या महाविकास आघाडी व भाजपच्या उमेदवारांनी होम टू होम मतदारांच्या गाठीभेटी घेऊन आपापला प्रभाग पिंजून काढल्याने निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे.
मतदारांनी दारात येणाऱ्या पॅनलप्रमुख, उमेदवारांच्या समोर आपापल्या प्रभागातील रखडलेली विकासकामे, सोयीसुविधाविषयी तक्रारी, अडचणीचा पाढा वाचला. यावेळी उमेदवारांनी येत्या पाच वर्षांत त्याची पूर्तता केली जाईल, असे हात जोडून, पाया पडून आश्वासन देऊन मतदारांचे उंबरठे झिजविल्याने प्रचारात चांगलीच रंगत आणली. पॅनल प्रमुख, उमेदवारांनी आपापल्या प्रभागात हलगीच्या निनादात निवडणुकीचे चिन्ह, गळ्यात पक्षाचे उपरणे घालून दुचाकी-चारचाकी वाहनातून पदयात्रा-रॅली काढून शेवटचा दिवस शक्तिप्रदर्शनाने गाजवला.
करावी लागणार प्रयत्नांची पराकाष्टा
५६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी बुधवारी प्रचार संपला असला तरी आता खरा कस आघाडी, पॅनलप्रमुख, उमेदवारांचा लागणार आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी गुरुवारी उमेदवार मतदारांना आर्थिक प्रलोभने, विकासकामे, अडचणीच्या वेळी मदत करतो, रस्ते, दिवाबत्तीची सोय करतो, पाणीपुरवठा अशा विकासकामाचे गाजर दाखवून मतांची जुळवाजुळव करताना प्रयत्नाची पराकाष्टा करावी लागणार, हे मात्र निश्चित आहे.
फोटो ओळ :::::::::::::::::::::::::
राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या महुद (ता. सांगोला) येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या सांगताप्रसंगी दुचाकी-चारचाकी रॅली काढून शक्तिप्रदर्शन केल्याचे छायाचित्र.