राकेश कदम
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांबद्दल अपशब्द वापरल्याच्या आराेपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आले. या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सायंकाळी विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैकात निदर्शने केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव आणि पदाधिकारी गुरुवारी सायंकाळी डाॅ. आंबेडकर चाैकात जमले. कार्यकर्त्यांच्या हातांमध्ये ‘जयंत पाटील यांना निलंबित करणाऱ्या ईडी सरकारचा निषेध’, नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी, ‘खाेकेवाल्या सरकारचा जाहीर निषेध’, ‘खाेके लेनेवालाेंकी तानाशाही नही चलेगी’ असे डिजिटल फलक हाेते. चाैकात थांबून कार्यकर्त्यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारविरुद्ध घाेषणा दिल्या.
Maharashtra Winter Session: जयंत पाटलांच्या निलंबनावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
भारत जाधव म्हणाले, अधिवेशनात लाेकांचे प्रश्न मांडले जातात. सध्याच्या अधिवेशनात सरकारला धारेवर धरल्याचा राग म्हणून जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, शहर युवक अध्यक्ष जुबेर बागवान, प्रशांत बाबर, महिला अध्यक्ष सुनीता राेटे, किसन जाधव, मनोहर सपाटे, प्रमोद भोसले, सुहास कदम, अमीर शेख, फिजू पैलवान, रूपेश भोसले, मिलिंद गोरे, रेखा सपाटे, लता फुटाणे आदी उपस्थित हाेते.