सोलापूर : मतदान केल्यानंतर मतदारांना त्याची पोचपावती देणाºया व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक पुन्हा मतदारांना दाखविण्याची मोहीम सुरू करण्यात येत आहे. मागील मतदानात ज्या केंद्रात मतदान कमी झाले किंवा जास्त झाले, त्याची कारणीमीमांसा काढण्यात येत आहे. कमी मतदान केंद्रावरील मतदान वाढविण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ यांनी पत्रकारांना दिली.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सातत्याने निवडणूक आयोगाकडून बैठका व आढावा घेण्यात येत आहेत. निवडणूक आयोगाकडून आलेल्या सूचनेनुसार पुन्हा एकदा व्यापक प्रमाणात नवीन मतदान यंत्र मतदारांपर्यंत पोहोचविण्यात येत असून, यासाठी २३ पथके तैनात करण्यात आल्याचेही धुमाळ यांनी सांगितले.
माढा व सोलापूर या दोन्ही लोकसभा निवडणुकीसाठी सुमारे ३४ लाख मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीनवर मतदान घेण्यात येणार आहे. या मशीनच्या सोबत मतदान केल्यानंतर ज्या उमेदवारास मत दिले, त्याची पोचपावती देणारे नवीन व्हीव्ही पॅट बसविण्यात येत आहेत.
या मशीनची माहिती देण्यासाठी पहिल्या टप्प्यात घेण्यात आलेल्या शिबिरात १ लाख २ हजार मतदारांना मशीन दाखविण्यात आले होते. एकूण मतदारांच्या एकूण पाच टक्केही नवीन मशीन न पोहोचल्याने ही मोहीम पुन्हा घेण्यात येत आहे. एकूण मतदारांच्या २५ टक्के मतदारांपर्यंत नवीन मशीनचे प्रात्यक्षिक पोहोचविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
ज्या मतदान केंद्र्रात ९० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे व ज्या केंद्रात ७५ टक्क्यांपेक्षा कमी मतदान मागील मतदानावेळी झाले आहे, त्याची कारणीमीमांसा करण्यात येत आहे. मतदारांना मतदानासाठी कशा पद्धतीने प्रेरणा देता येईल, याबाबत निवडणूक आयोगाकडून सातत्याने सूचना देण्यात येत आहेत. रोज यासंदर्भात नवीन सूचना निवडणूक कार्यालयास देण्यात येत आहेत.