सोलापूर : उत्तर तालुक्यात गावोगावी डेंग्यूसदृश (ताप, थंडी) आजाराने थैमान घातले असून, आरोग्य यंत्रणा व ग्रामपंचायती बघ्याच्या भूमिकेत आहेत. फवारणी व डास निर्मूलन होत नसल्याने आजाराचे प्रमाण वरचेवर वाढत आहे. यामुळे उपचारासाठी नागरिकांची दवाखान्यात गर्दी दिसत आहे.
कोरोनातून सावरलेल्यांना आता या आजाराला तोंड द्यावे लागत आहे.
यावर्षी जुलै महिन्यातील सात व ऑगस्ट महिन्यातील १८ दिवसांची अखंड विश्रांती सोडली तर जून महिन्यापासून तालुक्यात पाऊस सुरू आहे. यामुळे सर्वत्र गवताची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यात सतत पाऊस पडत असल्याने गावात जागोजागी असलेल्या खड्ड्यांत पाणी साचत आहे. अनायसा डासांच्या उत्पत्तीला पोषक वातावरण ठरत आहे. यामुळे नागरिकांचे आजार वाढत आहेत. त्यात शेताच्या कामानिमित्त लोकांना बाहेर पडावे लागते व पावसात भिजल्यानेही आजाराला निमंत्रण मिळत आहे.
आरोग्य विभागाने याबाबत दक्षता घ्यायला हवी व ग्रामपंचायतींनी सतत फवारणी करायला हवी. मात्र, तसे होत नसल्याने ताप, थंडी, हातपाय गळणे, खाज सुटणे, आदी आजारांचे प्रमाण वरचेवर वाढत आहे.
---
फाॅगिंग मशीन बंद
तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायतींनी घेतलेल्या फाॅगिंग मशीन बंद अवस्थेत आहेत. ज्या एजन्सीने मशीन पुरविल्या, तेच आता मशीन दुरुस्ती होत नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींची मोठी अडचण आहे.
---
दरवर्षी पावसाळ्यात गवत वाढते व पाणी साचून डास तयार होतात. त्यामुळे फवारणी करण्याची खबरदारी ग्रामपंचायतींनी घेतली पाहिजे. त्यासाठी कोणाच्या आदेशाची गरज नाही. घरोघरी सध्या आजारी लोक आहेत.
- अमोल पाटील
जिल्हाध्यक्ष, छावा संघटना
---