कुर्डूवाडी : कुर्डूवाडी शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या महिन्यापासून वरचेवर कमी कमी होत चालला असून ही आनंदाची बाब असताना मात्र डेंग्यूच्या साथीने येथे डोके वर काढले आहे. त्यातच डेंग्यूचा पहिला रुग्ण विद्यमान उपनगराध्यक्षांच्या घरातच निघाला. पालिका प्रशासन काय उपाययोजना करतेय असा प्रश्न करत असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.
शहरातील नगरपरिषद व ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य विभागाने यावर तातडीने मोठ्या उपाययोजना कराव्यात, शहरात स्वच्छतेबरोबरच सर्व घरांतील कंटेनर सर्वे करून फवारणी करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
येथील उपनगराध्यक्षा उर्मिला हरिदास बागल यांच्या घरातील एका मुलाला गेल्या काही दिवसांपासून तापाची लक्षणे दिसून येत होती. त्यामुळे त्यांनी त्याला एका खासगी दवाखान्यात घेऊन जाऊन पुढील उपचार सुरू केले, यावेळी त्याची टेस्ट केली असता ती व्यक्ती डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कोरोनाला तोंड देता देता नाकीनऊ आलेला सर्वसामान्य नागरिक यामुळे चिंताग्रस्त झाला आहे. याचबरोबर शहरात सध्या व्हायरल फिव्हर, प्लेटलेट कमी होण्याचे, सर्दी व तापाची लक्षणे असणारे रुग्णही बऱ्याच प्रमाणात आढळून येत आहेत. सध्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, डेंग्यूचा रुग्ण मिळून आल्याने मात्र नागरिकांच्या चिंतेत भर पडलेली आहे.
--------
शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळवा. आपलं घर व परिसर स्वच्छ ठेवावा. आम्ही आमच्या यंत्रणेमार्फत शहरात फवारणी करत असून सर्व्हेही करत आहोत.
- तुकाराम पायगण,आरोग्य निरीक्षक,नगरपरिषद, कुर्डूवाडी
----
आमच्या घरातील एका मुलाला डेंग्यूची लागण झाल्याचे खासगी डॉक्टरांकडून तपासणी दरम्यान समजले. त्या रुग्णांवर व्यवस्थित उपचार करून तो बरा झालेला आहे. शहरात याबाबतची फवारणी करून कंटेनर सर्व्हे करावा. नागरिकांनीही याबाबत स्वतःची काळजी घ्यावी.- उर्मिला हरिदास बागल,उपनगराध्यक्षा, नगरपरिषद, कुर्डूवाडी
---
....................