पंढरपूर : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवनी समाधी सोहळ्यासाठी श्री विठ्ठलाच्या पादुकांचे शुक्रवारी सकाळी ८ वाजता आळंदीकडे प्रस्थान झाले. कोरोनाच्या सावटामुळे यंदा महाराज मंडळीसह या पादुका राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी. बसने रवाना झाल्या.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी साक्षात श्री विठ्ठल भगवान त्यांना भेटायला गेले होते, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे श्री.विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने सन २०१४ पासून विठ्ठलाच्या पादुका आळंदीकडे पायी वारी करत नेण्यात येतात. कोरोनाच्या सावटामुळे विठ्ठलाच्या पादुका यंदा एसटीने प्रवास करीत आळंदीस रवाना झाल्या.
दरवर्षी विठ्ठलाच्या पादुका तसेच संत नामदेवराय आणि संत पुंडलिकांच्या पादुका कार्तिक शुद्ध एकादशी झाल्यानंतर पौर्णिमेला पंढरपुरातून पायी प्रस्थान करतात. यंदा कोरोनामुळे पायी वारी रद्द करण्यात आली. त्यामुळे विठ्ठलाच्या पादुका एसटीने आळंदीला रवाना झाल्या. साधारण पाच महिन्यांपूर्वी झालेल्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी यंदा कोरोनामुळे सर्व संत एसटीने पंढरपूरला आले होते. त्यानंतर आता विठ्ठलालाही एसटीने माउलीच्या भेटीसाठी आळंदीला जावे लागले आहे.
शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास विठ्ठलाच्या पादुका एसटीने आळंदीला प्रस्थान झाले. विठ्ठलाच्या पादुकांसमवेत एसटीने मंदिर समितीचे सदस्य नित्योपचार विभागातील पुजारी आणि सुरक्षारक्षक असे २० लोक आळंदीकडे रवाना झाले. यावेळी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज देशमुख (जळगावकर), प्रकाश महाराज जवंजाळ तसेच व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, विभाग प्रमुख बलभीम पावले उपस्थित होते.
पादुका घेऊन जाणाऱ्या एसटीला झेंडुंच्या फुलांची सजावट करण्यात आली होती. दोन दिवसांचा आळंदी येथे पादुकांचा मुक्काम असणार आहे. त्रयोदशीला अर्थात १३ डिसेंबर रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवनी समाधी सोहळा दिवशी विठ्ठलाची आणि माउलीची भेट होईल. त्यानंतर या पादुका परत एसटीनेच पंढरपूरला परतणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
फोटो- ११पीएएनडी०१- पांडुरंगाच्या पादुका घेऊन जाणाऱ्या एस.टी. समोर उभे मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज-जळगावकर, प्रकाश महाराज जवंजाळ, मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड.