सोलापूर - शेतकऱ्यांना बी-बियाण्यांची गुणवत्ता चांगली मिळण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण कक्षाने कडक कारवाई करावी. बी-बियाणे निकृष्ठ किंवा बनावट असतील, इतर कृषी निविष्ठांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी असतील तर दोषींवर कृषी, महसूल विभागाने कडक कारवाई करावी. शिवाय बी-बियाणे आणि खतासोबत इतर कीटकनाशके खरेदी करणे शेतकऱ्यांना बंधनकारक नाही. शेतकऱ्यांना कोणी खरेदीची जबरदस्ती केल्यास संबंधित विक्रेत्यांचा परवाना निलंबित करा, अशा सूचनाही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.
जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व बैठकीत भरणे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, आत्माचे उपसंचालक मदन मुकणे, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री भरणे यांनी सांगितले की, यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याने योग्य नियोजन करावे. रब्बी पिकाचा जिल्हा आता खरिपाचा झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळू लागली आहे. ५८ हजार हेक्टर क्षेत्रावरून ३ लाख ७४ हजार हेक्टर क्षेत्र वाढले आहे.
बैठकीला ऑनलाईनद्वारे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, ओमराजे निंबाळकर, आमदार बबनराव शिंदे, प्रशांत परिचारक, सचिन कल्याणशेट्टी, रणजितसिंह मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अनिल मोटे हे उपस्थित होते.