अकलूज : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याकरिता श्रीमंत ऊर्जितसिंंह शितोळे सरकार यांच्या अश्वांनी मंगळवारी श्री क्षेत्र आळंदीकडे प्रस्थान ठेवले. हे अश्व गुरुवार दि. १९ जून रोजी आळंदीत दाखल होतील.श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा शुक्रवार दि. २० जून रोजी आषाढी वारीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पालखी सोहळ्याकरिता अंकोलीचे श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या अश्वांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोमवारी सकाळी ९.३० वाजता श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या माऊली मंदिरातून एक दिंडी शितोळे सरकार यांच्या राजवाड्यावर पोहोचली. त्यानंतर शितोळे सरकार यांनी माऊली व जरीपटक्याची विधिवत पूजा व आरती केली. त्यानंतर जरीपटका स्वाराकडे सुपूर्द करण्यात आला. श्रीमंत महादजीराजे शितोळे सरकार यांनी सकाळी ९.४५ वाजता अश्वांची विधिवत पूजा केली. यावर्षी माऊलींच्या सेवेत माऊलींचा अश्व म्हणून हिरा नावाचा तर स्वाराचा अश्व म्हणून गजानन दाखल झाले आहेत. प्रथमच माऊलींच्या अश्वावर चांदीचे सिंहासन व छत्र बसविण्यात आले आहे.या सिंहासन व छत्राची विधिवत पूजा करण्यात येऊन गावामधून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर अश्व श्री क्षेत्र आळंदीकडे मार्गस्थ झाले. शितोळे सरकार यांचे प्रतिनिधी म्हणून तुकाराम कोळी हे अश्वासह आळंदीकडे मार्गस्थ झाले.म्हैसाळ मुक्कामानंतर अश्व तुंग, पेठनाका, वाहगाव, सातारा, भुर्इंज, शिरवळ, शिंदेवाडी, पुणेमार्गे शुक्रवार दि. १९ रोजी श्री क्षेत्र आळंदीत दाखल होणार आहेत.
माऊलींच्या अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान
By admin | Published: June 11, 2014 12:22 AM