तुळजापूर : मुदत ठेव योजना, दामदुप्पट योजनांद्वारे जादा व्याज देण्याचे अमिष दाखवून ठेवीदारांना तब्बल ४५ लाख ३६ हजार ३४५ रूपयांचा चुना लावणाऱ्या ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को-आॅप. क्रेडीट सोसायटीच्या व्हाईस चेअरमनसह १२ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ११ जून २०१६ ते आजतागायत तुळजापूर शहरात घडली़बँकेचे व्यवस्थापक नारायण देविदास शिंदे यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ बँकेचे व्हा़ चेअरमन भाऊसाहेब इंद्रराव शिंदे, सचिव दत्तात्रय नारायण बोरसे, सदस्य शिवाजी बाबुराव जाधव, शंकर शिवराम शिंदे, भास्कर तुकाराम खुर्दे, रफीक महंमद शेख, परसराम विठोबा काळे, संतोष चंद्रकांत आहिरे, विठ्ठल रंगनाथ वाघ, भगवान मुरलीधर बोराडे, वैशाली सतिश काळे, गंगुबाई संजय खताळे (सर्व रा़ स्टेशन रोड लासलगाव ता.निफाड जि.नाशिक) हे सर्वजन बँकेचे सदस्य आहे़ या सर्वांनी संगनमत करुन ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को-आॅप. क्रेडिट सोसायटी लि शाखा तुळजापूर येथे ठेवीदारांना बँकेत मुदत ठेव योजना, दाम दुप्पट योजना, पेन्शन योजना, आर.डी.पिग्मी आदी योजनांची माहिती सांगून बँकेच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये इतर बँकांपेक्षा जादा व्याजदर देतो, ग्राहकांना आमिष दाखविले़ ग्राहकांना आमिष दाखवून तब्बल ४५ लाख ३६ हजार ३४५ रूपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़बँक व्यवस्थापक नारायण देविदास शिंदे यांच्या फिर्यादीवरून वरील १२ जणांविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस उपनिरीक्षक माने या करीत आहेत़
ठेवीदारांना तब्बल ४५ लाखांचा चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 5:42 AM