रवींद्र देशमुख / सोलापूर : आई-वडील सहा महिन्याच्या फरकाने मृत पावले. त्यांचा विरह सहन झाल्यानं खचलेला तरुण गेल्या चार महिन्यांपासून गायब झाल्याची वार्ता बहिणीला समजली. तिने मुंबईहून थेट सोलापूर गाठून भाऊ गायब झाल्याची तक्रार जेलरोड पोलीस ठाण्यात दिली आहे. अजय सुधीर गांगुर्डे (वय- ३६, न्यू पाच्छा पेठ, सोलापूर) असं गायब झालेल्या तरुणाचं नाव आहे.
यातील गायब झालेल्या तरुणाची बहीण अंजली विशाल माने यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यातील तरुणाचे वडील हे पोलीस सेवेत होते. २०२१ साली ते निवृत्त झाले. त्यानंतर कोरोना काळात २०२२ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्या पाठोपाठ सहा महिन्याच्या फरकानं तरुणाच्या आईही मरण पावली. गायब झालेला अजय आणि अर्जदार अंजली हे दोघेच बहीण भाऊ असल्याचे समोर आले.
आई-वडिलांच्या मृत्यूनं खचलेला तरुण एकटाच घरात राहत होता. कारखान्यामध्ये वॉचमनची नोकरी करुन त्याची गुजराण सुरु होती. तो फारसे कोणाशी बोलतही नव्हता. अधून-मधून मुंबईत असलेल्या बहिणीचे त्याच्याशी बोलणे होत असे. चार महिन्यांपासून भावाला फोन करुनही तो लागत नसल्याचे अंजली या २४ मार्च रोजी सोलापुरात आल्या. राहत्या घरी गेल्यानंतर घर बंद होते. चार महिन्यापासून भावाला कोणी पाहिले नसल्याचे आजूबाजूच्यांनी सांगितले. नातेवाईक, मित्रमंडळींके चौकशी करुनही काही थांगपत्ता लागत नसल्याने जेलरोड पोलीस ठाण्यात भाऊ गायब झाल्याची तक्रार अंजली माने यांनी दिली आहे. या प्रकरणी हवालदार बी. बी. घुगे तपास करीत आहेत.