पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मंदिर भाविकांसाठी खुले करावे या मागणीसाठी विश्व वारकरी सेना, बहुजन वंचित आघाडीकडून ३१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलना दरम्यान एसटी बसची तोडफोड होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पंढरपुरातून जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व एसटी बस सेवा ३६ तास बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात वारकऱ्यांना योग्य त्या नियम व अटीच्या अधीन राहून भजन-कीर्तन करण्यास परवानगी द्यावी. मंदिर भाविकांना दर्शनासाठी उघडे ठेवावे. त्याचबरोबर इतर मागण्यांसाठी चलो पंढरपूर असा नारा देऊन किमान एक लाख वारकरी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचाबाबत जाहीर आवाहन केले आहे.
तसेच वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे त्यांनी देखील कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना पंढरपुरात येण्याचे जाहीर आवाहन केले आहे. त्याचबरोबर बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने देखील या आंदोलनास पाठिंबा देण्यात आला आहे. यामुळे शेतकरी देखील गर्दी करतील.
सोलापूर जिल्ह्यातील यापूर्वी झालेल्या मोठ्या आंदोलनाचा इतिहास पाहता आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या मागण्यासाठी एसटी बसची तोडफोड केल्याने घटना घडल्या आहेत. राज्यातील इतर भागातून व सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आंदोलन करते या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. शासनाकडून आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत विचार होण्यास विलंब झाला तर एसटी बसची तोडफोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एसटी बसची तोडफोड होऊ नये. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ३० ऑगस्ट दुपारी १२ वाजल्यापासून ते ३१ ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजेपर्यंत पंढरपूर कडे जाणाऱ्या सर्व एसटी बस बंद ठेवण्यात अशी मागणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केली होती. त्यामूळे पंढरपुरातून बाहेर जाणाऱ्या व पंढरपुरात येणाऱ्या एस टी बस बंद करण्यात आले आहेत.
या जिल्ह्यातून पाठिंबा
या आंदोलनासाठी अकोला, नाशिक, दिंडोरी, गंगाखेड, अहमदनगर व अचलपूर या ठिकाणच्या विश्व वारकरी सेना व युवा विश्व वारकरी सेना यांच्यावतीने पाठिंबा देण्यात आला आहे.