उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कल्याणराव काळे यांच्यावर गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 01:05 PM2020-10-08T13:05:38+5:302020-10-08T13:06:10+5:30
शेतकऱ्याच्या तक्रारीची घेतली दखल; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांकडे मागील हंगामातील एफआरपीची जवळपास सहा कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी मिळावी यासाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. तरीही साखर कारखानदार दाद देत नाहीत. अशातच पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील विशाल चव्हाण या शेतकऱ्याने भाजप नेते कल्याणराव काळे यांच्या कारखान्याची तक्रार थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करा, असा सल्ला संबंधित शेतकऱ्याला दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
शेतकरी विशाल चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संवादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. संवादामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आठ दिवसापूर्वी शरद पवार पंढरपूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पवारांनी आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी भेट नाकारल्याने काळे नाराज होऊन परत गेले होते. त्यानंतर कालच आमदार भारत भालके यांनी काळे यांची नाराजी दूर करण्यासाठी "कल्याणराव काळे भाजपत असले तरी आम्ही विठ्ठल परिवार म्हणून एकच आहोत' असे सांगत सारवासारव केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी काळेंच्या कारखान्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट गुन्हा दाखल करण्याचा सल्ला संबंधित शेतकऱ्यांना दिल्याने काळेंच्या समोर अडचणी वाढल्या आहेत.
सध्या सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या ऊस गाळप हंगामाची तयारी सुरू आहे. अनेक कारखान्यांचे बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम संपन्न झाले आहेत. अशातच थकीत एफआरपीच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाल्याने वाद आणखी पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.