सोलापूर : पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी दुपारी अडीच वाजता पंढरपुरात येत आहेत. सायंकाळी ते सोलापूर मुक्कामी असतील.
गेल्या तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे भीमा, सीना नदीला पूर आला आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी चुकीचे नियोजन करुन उजनी धरणातून पाणी सोडले. त्यामुळे चंद्रभागा नदीला महापूर आला आणि पंढरपूर शहरात पाणी शिरले. नदीकाठच्या गावांनाही मोठा फटका बसला.
सोलापूर शहरात नाल्याच्या पाण्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले. शहरातील नागरिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. या स्थितीची माहिती घेण्यासाठी अजित पवार दौºयावर येत आहेत. पंढरपूर, मोहोळ भागातील पाहणी झाल्यानंतर सायंकाळी ते शासकीय विश्रामगृहात येतील, असे राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले.