पंढरपूर : कार्तिकी यात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मातेच्या शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार येणार आहेत. त्यांच्या सुरक्षेचा भाग म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व शासकीय विश्रामगृहाशी निगडित असणाऱ्या एकूण १३९ लोकांची कोरोनाची चाचणी करण्यात आले आहेत. त्यात सर्व जण निगेटिव्ह आले आहेत.
कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त महापूजा करण्याचा मान उपमुख्यमंत्र्यांना आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कार्तिकी यात्रेच्या महापूजेसाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार हे पंढरपुरात मुक्कामी येणार आहेत. ते शासकीय विश्रामगृह येथे थांबणार आहेत. त्यामुळे त्याठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस कर्मचारी, चौकीदार, स्वयंपाकी व बांधकाम विभागाच्या अन्य कर्मचाऱ्यांची मिळून २६ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. या चाचणी दरम्यान सर्व कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
शासकीय महापूजा झाल्यानंतर मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात येतो. या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमास मंदिर समितीचे अध्यक्ष, सदस्य, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित असतात.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व त्यांच्यासह येणाऱ्या मंत्र्यांचा सुरक्षेचा भाग म्हणून मंदिरातील ११३ लोकांची कोरोना चाचणी झाली आहे.