आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३ : खेडी स्वयंपूर्ण झाली तरच राष्ट्र स्वयंपूर्ण होईल, असे महात्मा गांधी नेहमी म्हणायचे. खेड्यांच्या वैभवावरच राष्ट्राचे वैभव आहे, हेच शाश्वत सत्य आहे. गांधीजींचेच हेच कार्य आम्हीही करीत आहोत, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.गांधी फोरम नवी दिल्लीच्या वतीने हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये पत्रमहर्षी स्व. रंगाअण्णा वैद्य यांच्या २१ व्या स्मृतिनिमित्त गांधी फोरम पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. त्याप्रसंगी देशमुख बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी गांधी फोरम नवी दिल्लीचे केंद्रीय प्रभारी अध्यक्ष पुरूषोत्तम बलदवा होते. प्रमुख पाहुणे महापौर शोभा बनशेट्टी, माजी आमदार निर्मला ठोकळ, मुंबई फोरमचे अध्यक्ष अरूण कुलकर्णी यांच्यासह सत्कारमूर्ती लोकमतचे संपादक राजा माने, पंचांगकर्ते मोहन दाते, प्रभाकर वनकुद्रे, माजी महापौर डॉ. पुंजाल, ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने व्यासपीठावर उपस्थित होते.प्रारंभी आदर्श समाजसेवा पुरस्काराने पाचही सत्कारमूर्तींचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सुभाष देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना सहकारमंत्री पुढे म्हणाले, महात्मा गांधींनी खेड्याकडे चला, असा मंत्र दिला. तो अनुसरण्याची गरज आहे. आम्ही मंत्री झाल्याबरोबर खेड्यातील सोसायट्यांमधील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले. त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सातत्याने करीत असतो. अण्णांची आठवण सांगून ते म्हणाले, राज्यकर्ते म्हणून गरिबांची सेवा करा, असा संदेश त्यांनी अखेरच्या काळात आपणास दिला होता. लोकमंगलच्या माध्यमातून ही सेवा सुरू आहे. लोकमंगलच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून जनसेवेचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. पुरूषोत्तम बलदवा यांनी आपल्या भाषणातून अण्णांच्या आठवणींना उजाळा दिला. अण्णांच्या कार्याचे स्मरण महाराष्ट्राला सातत्याने होत राहावे यासाठी त्यांचा पुतळा शहरात उभारला जावा, अशी मागणी त्यांनी मंत्र्यांपुढे केली. यासोबतच दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र आणि ज्येष्ठ पत्रकार या नात्याने अण्णांच्या नावाने ग्रामीण पत्रकार अध्ययन केंद्र सुरू करावे आणि सोलापूरच्या दोन्ही मंत्र्यांनी फोरमच्या रक्तसंकलन मोहिमेसह सर्व सामाजिक उपक्रमात पाठीशी राहावे, अशी मागणी त्यांनी याप्रसंगी केली.माजी आमदार निर्मला ठोकळ यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गांधी फोरमचे अध्यक्ष मोहन वैद्य यांनी केले. संचालन नागेश खमितकर तर आभार सातलिंग शटगार यांनी मानले. कार्यक्रमादरम्यान श्रीशैल हत्तुरे, बी.के. मुल्ला, दिलीप पतंगे, अभिजित संगावा, अरूण कुलकर्णी, रघुनाथ बनसोडे आदींचाही विशेष सत्कार करण्यात आला. वीणा बादरायणी यांनी महात्मा गांधींची आवडती भजने सादर केली.------------------ सत्काराला उत्तर देताना लोकमतचे संपादक राजा माने यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन आणि कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. हा धागा पकडून सुभाष देशमुख म्हणाले, सात-बारा कोरा करण्याच्या मागणीवर सरकार सहमत आहे. पण या मागणीवर चिंतन व्हावे. २००७-०८ मध्ये कुणाचे सात-बारा कोरे झाले हे आधी समजून घ्यावे. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या गरजा कटाक्षाने जाणून घेत आहेत. वीज, पाणी, खत, हमीभाव, नाशिवंत मालाची विक्रीव्यवस्था याकडे आवर्जून लक्ष घालत आहेत. जलयुक्त शिवाराच्या यशस्वीतेसाठी स्वत: बांधावर पोहोचत आहेत. शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. सध्याचा शेतकऱ्यांचा संप म्हणजे आताचा उद्रेक नव्हे तर, गेल्या अनेक वर्षांतील अन्यायाचा हा परिणाम आहे. अन्नदात्याच्या पाठीशी राहा, असे आवाहनही त्यांनी केले.
खेड्यांच्या वैभवावरच राष्ट्राचे वैभव : सुभाष देशमुख, गांधी फोरम पुरस्काराचे थाटात वितरण
By admin | Published: June 03, 2017 5:02 PM