साेलापूर : बाजार समितीच्या सभापतीपदाला एक वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मी राजीनामा देणार हाेताे. बळिराम साठे आणि बाळासाहेब शेळके यांना भेटून तशी इच्छाही व्यक्त केली हाेती. पण त्या दाेघांनीच मला थांबायला सांगितले. मला सभापती केलेल्या संचालक मंडळाने सांगितले तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, असे आमदार विजयकुमार देशमुख यांनी मंगळवारी सांगितले.
आमदार देशमुख यांनी सभापतीचा राजीनामा द्यावा अशी मागणी माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, काॅंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी केली आहे. देशमुख राजीनामा देत नसतील आम्ही काय करायचे ठरवू, असेही साठे म्हणाले हाेते. साठेंना प्रत्युत्तर देताना आमदार देशमुख म्हणाले, बाजार समितीमधील संचालकांनी एकत्र येऊन मला सभापती केले. या संचालकांनी सांगितले तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. यासाठी संचालक मंडळाची बैठक व्हायला हवी. बाजार समितीमधील काेणताही निर्णय संचालकांच्या सहमतीशिवाय हाेत नाही. नव्या सभापती निवडीसाठी संचालकांची बैठक घ्या. तिथेच निर्णय हाेईल. परंतु, राजीनामा दिला तर असे करीन तसे करीन काेणी म्हणत असेल तर मी धमक्यांना घाबरणारा नाही, असा इशाराही देशमुख यांनी दिला.
मनसे कार्यकर्त्यांसाेबत बैठक
राज्य पातळीवर भाजप व मनसेच्या युतीची चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर आमदार देशमुख यांनी मंगळवारी मनसेच्या शहर कार्यालयाला भेट दिली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांसाेबत माझे जुने संबंध आहेत. त्यांनीच मला भेटीचे निमंत्रण दिले हाेते. महापालिकेच्या यापूर्वीच्या निवडणुका आणि शहरातील इतर घडमाेडींवर चर्चा झाली. परंतु, युती किंवा आघाडीवर यावर चर्चा झाली नाही. हा माझा अधिकार नाही. आमच्याकडे पक्षाचे अध्यक्ष सर्वकाही ठरवित असतात, असे आमदार देशमुख यांनी सांगितले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, नगरसेवक संजय कोळी आदी उपस्थित होते.