आषाढी वारीसंदर्भात १० जूनला राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. या बैठकीत कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रा करण्याबाबत नियोजन आखले आहे. या बैठकीतील चर्चेनुसार सध्या परिस्थिती लक्षात घेऊन आषाढी यात्रा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शासनाने याबाबत एक नियमावली तयार केली आहे.
मानाच्या १० पालखी सोहळ्यांचा आषाढी वारी प्रस्थान सोहळा यावर्षी देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० व उर्वरित आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल. यामुळे या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या पालख्या व दिंड्यांना प्रतिनिधीक स्वरुपात प्रस्थान सोहळ्याद्वारे आषाढी वारीमध्ये सहभागी होता येणार आहे. मानाच्या पालखी सोहळ्यांना पायी वारी करण्यासाठी प्रस्थान ठिकाणापासून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे १.५ कि.मी. अंतर प्रातिनिधीक स्वरूपात पायी वारी करता येणार आहे.
यावर्षी सर्व मानाच्या पालखी सोहळ्यांचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन होऊन पौर्णिमेच्या दिवशी प्रस्थान करता येणार आहे. शासकीय महापूजा, श्री विठ्ठलास संतांच्या भेटी गतवर्षीप्रमाणे मान्यता देण्यात आली आहे. विठ्ठलाचे नित्योपचार परंपरेनुसार सुरू ठेवून आषाढी यात्रा कालावधीमध्ये भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. श्री संत विठ्ठलाच्या पादुकांची मिरवणूक साध्या पद्धतीने साजरा करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
वैद्यकीय तपासणीनंतर चक्रीभजनास परवानगी
ह.भ.प. देगलूरकर महाराज व अन्य ४ व्यक्ती असे एकूण ५ व्यक्तींना वैद्यकीय तपासणीच्या अधीन राहून चक्रीभजनास परवानगी देण्यात आली आहे. ह.भ.प. अंमळेनरकर महाराज व ह.भ.प. कुकुरमुंडेकर महाराज यांच्यासोबत प्रत्येकी २ व्यक्तींना वैद्यकीय तपासणीच्या अटीच्या दर्शनासाठी परवानगी देण्यात आली आहे.
----
रथोत्सव मंदिराच्या वाहनातून
महाद्वार काला व श्री संत नामदेव महाराज समाधी सोहळा ११० व्यक्तींसह सामाजिक अंतर राखून योग्य ती खबरदारी घेऊन साजरी करण्यास परवानगी देण्यात आली. एकादशीच्या दिवशीचा रथोत्सव रथाऐवजी मंदिराच्या स्वतंत्र वाहनाने १० मानकरी व मंदिर समितीचे ५ कर्मचारी असे १५ व्यक्तींसह कोरोनाचे नियम पाळून साजरी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
---
ठळक बाबी
- यावर्षी प्रती मानाच्या पालखी ४० वारकऱ्यांना संताच्या पादुका भेटीची परवानगी देण्यात आली आहे.
- २ बस व प्रत्येकी बसमध्ये २० प्रमाणे ४० वारकऱ्यांची संख्या निश्चित करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- मानाच्या पालखी सोहळ्यांना १-१० या प्रमाणात गोपाळपूर येथे भजन व कीर्तन करावे.
- संताचे नैवेद्य व पादुकासाठी दशमी ते पौर्णिमा असे ६ दिवस २ व्यक्तींना परवानगी देण्यात येत आहे.
- संत एकनाथ महाराज काला : संत एकनाथ महाराज यांच्या दिंडीला ज्या प्रमाणात शासनाकडून प्राप्त होईल. तितक्या व्यक्तींच्या उपस्थितीत संत एकनाथ महाराज काला करण्यास परवानगी देण्यात येत आहे. त्याबाबत मंदिर समितीमार्फत नियोजन करण्यात येईल.
- श्री विठ्ठलाची प्रक्षाळ पूजा समिती सदस्यांच्या हस्ते सपत्निक २-३ श्री रुक्मिणी मातेची प्रक्षाळपूजा २-३, श्री विठ्ठलाकडे ११ ब्रम्हवृंदांकडून विठ्ठलास रुद्राचा अभिषेक व रुक्मिणीमातेस ११ ब्रम्हवृंदास पवनमान अभिषेक करता येणार आहे.
- आषाढी एकादशी दिवशी स्थानिक महाराज मंडळींना श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे मुखदर्शन देण्यास परवानगी देण्यात आली आहे.