रविंद्र देशमुख
सोलापूर : घरातून चांगले संस्कार मिळावे लागतात, ते तुमच्याकडे नाहीत, ८३ वर्षांचे असूनही पवार साहेब व माझे वडील महाराष्ट्र पिंजून काढतात, तुम्हाला लढायचं असेल तर माझ्याशी लढा, मी उभी आहे, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला, अशा शब्दांत महाविकास आघाडीच्या सोलापूरच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी नाव न घेता विरोधकांचा समाचार घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वडाळा येथील संवाद बैठकीत त्या बोलत होत्या. मी १५ वर्षे उगीच निवडून आले का, असा प्रश्न विरोधकांना विचारत तुमची लेक लोकशाही, शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी लढतेय असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.
माझे उत्तर तालुक्याशी १९७८ पासून संबंध आहेत, मला पाच वेळा तुम्ही निवडून दिले, नान्नजचे गंगाराम घोडके ताकदीने काम करायचे असे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यावेळी बोलताना म्हणाले. मोदी सरकारने लोकांचे प्रश्न बाजूला ठेवल्याचा आरोप करीत शरद पवार व मी वेगवेगळे झालो तरी आमचे नाते तुटले नाहीत, असे शिंदे म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादीच्या महेश माने, प्रा. वैशाली साठे, प्रल्हाद काशिद, शरद माने, अभिजित पाटील यांनी आघाडीला का मतदान करायचे ? हे सांगितले. प्रास्ताविक जयदीप साठे यांनी, तर आभार नागेश पवार यांनी मानले. बैठकीला काँग्रेसचे सुरेश हसापुरे, चेतन नरोटे, शालिवाहन माने-देशमुख, राष्ट्रवादीचे अविनाश मार्तंडे, उपसरपंच अनिल माळी, रमेश सुतार, राजाराम गरड, बालाजी गरड, अमोल पाटील, जितेंद्र शिलवंत, दयानंद शिंदे, दीपक अंधारे, दिलीप माने, रतिकांत पाटील आदी उपस्थित होते.