सोलापूर : गतवर्षीच्या तुलनेत यंदा दसरा व दिवाळीत वाहनांची विक्री कमी होऊनही किमती वाढल्याने आरटीओकडील महसूल वाढल्याचे दिसून येत आहे.
या वर्षीच्या आर्थिक वर्षात कोरोना साथीमुळे लॉकडाऊन जाहीर झाल्याने वाहन उद्योगावर परिणाम झाला. गुढीपाडव्याला वाहनांची विक्रीच झाली नाही. त्यानंतर साथीचा जोर ओसरल्यावर लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यावर हळूहळू बाजार पूर्वपदावर आला. अशाही स्थितीत यंदा दसरा आणि दिवाळीत वाहन बाजार त्या मानाने तेजीत राहिला. मात्र गतवर्षीइतकी दुचाकी व चारचाकी वाहनांची विक्री झाली नाही. तरीही वाहन विक्रीतून आरटीओकडे गतवर्षीपेक्षा जादा महसूल जमा झाला.
आरटीओकडे वाहन विक्रीतून जादा महसूल जमा होण्याचे कारण म्हणजे प्रदूषण नियमांमुळे वाहनांमध्ये करण्यात आलेला बदल. एप्रिल २०२० नंतर प्रदूषणांचे मानांकन बीएस: ४ प्रकारच्या वाहनांची नोंदणी बंद करण्यात आली. आता बीएस:५ मानांकनाची वाहने बाजारात आली आहेत. या बदलामुळे वाहनांच्या बनावटीत बदल करण्यात आल्याने किमती वाढल्या आहेत. वाहनांच्या किमती वाढल्याने त्या प्रमाणात आरटीओचे शुल्कही वाढले आहे. त्यामुळे १ ऑक्टोबर ते २२ नोव्हेंबरच्या उलाढालीतून आरटीओला महसूल जादा मिळाल्याचे दिसून येत आहे.
अशी झाली उलाढाल
सन २०१९ विक्री
सर्व दुचाकी: ७६४२
मोटरकार: ६३३
मालवाहू वाहन: ४५७
वाहन कर: १९ कोटी २२९ लाख
सन २०२० विक्री
सर्व दुचाकी: ६०४८
मोटरकार: ८१२
मालवाहू वाहन: ३७१
वाहन कर: २१ कोटी ५ लाख
कोरोना साथीमुळे यंदा १ ऑक्टोबर ते २२ नोव्हेंबर या सणांच्या काळात वाहनांची विक्री कमी झाली तरी प्रदूषण मानांकनात बदल झाल्याने वाहनांच्या किमती १५ टक्क्यांनी वाढल्या. त्यामुळे वाहन करात वाढ दिसून येत आहे.
- संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी