शीतलकुमार कांबळे
सोलापूर : मागील काही दिवसांपासून सतत पडणारा पावसामुळे मुंबई परिसरात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. तरीही सोलापूरचा एक तरुण मोफत शिक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे सायकलवरुन गेला आहे.
मोफत शिक्षणाचा अधिकार अंतर्गत (आरटीई) बारावीपर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण द्यावे, शासनाने शाळांना आरटीईची थकबाकी द्यावी या मागणीसाठी रॉबर्ट गौडर हे सोलापूर ते मुंबई सायकलवरुन गेले आहेत. मुंबईला जातना रस्त्यामध्ये मोठा पाऊस, दरड कोसळणे आदी अडथळे येऊनही ते आझाद मैदान येथे पोहोचले. रॉबर्ट गौडर यांनी आझाद मैदानामध्ये प्रदर्शन केले. मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांची भेट घेणार आहे.
आरटीई कायद्यानुसार आर्थिक दुर्बल घटकातील मुलांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. त्यानुसार आठवीपर्यंतचे शिक्षण हे फक्त आठवीपर्यंत आहे. आठवीनंतर आपल्या मुलांना खासगी शाळेत शिकविणे पालकांना आर्थिक अडचणीचे ठरते. यामुळे अनेक पालक मुलांची शाळा बदलतात किंवा शाळेतून काढून टाकतात. यामुळे या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. म्हणून शासनाने बारावीपर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण द्यावे यासाठी रॉबर्ट गौडर हे आंदोलन करत आहेत.