माढा : शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या, मीटरप्रमाणे बिल आकारणी करण्यात यावी, या मागण्यांसाठी माढा तालुक्यातील जामगाव येथील वीज वितरण कार्यालयासमोर लाइटच्या उजेडात अंध शेतकरी मालोजीराजे चव्हाण हे उपोषणास बसले आहेत. आधीच नियतीने अंधत्व दिले. आता सरकारमुळे जीवनात अंधार पसरत असल्याची भावना त्यांनी बोलून दाखविली.
सध्या शेतकऱ्यांना विजेची गरज आहे. द्राक्षे उतरण्याचा सीझन चालू असून, यासाठी पाण्याची मोठी गरज आहे. दुष्काळी परिस्थितीतदेखील मोठ्या खर्चाने उत्पन्न घेतले आहे. वीजपुरवठा खंडित केला आहे. दोन तास वीज दिल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत केल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका अंध शेतकरी मालोजीराजे चव्हाण यांनी मांडली आहे.
यावेळी पंडित साळुंखे, मधुसूदन पाटील, मोहन पाटील, भास्कर चव्हाण, पवा चव्हाण, अभिजित चव्हाण, मदन पाटील, विशाल बारबोले, हनुमंत घोडके, हुसेन शेख, रविराज पाटील, महेश चव्हाण, भाऊसाहेब चव्हाण, विशाल पाटील, राजाराम चव्हाण, गणेश चव्हाण, अभिजित चव्हाण, आकाश घुले, नाना बोबडे, अशा शेकडो शेतकऱ्यांनी या आंदोलनाला पठिंबा दिला आणि उपस्थिती दर्शवली.
..........
एकीकडे शेतकरी विजेसाठी आत्महत्या करीत आहेत, तर बिलासाठी दुसरीकडे वीजपुरवठा खंडित करण्याचे मोहीम सरकारने हाती घेतली आहे. शेतकऱ्यांचे अनुदान, वीज पोलचे भाडे यासह ऊस बिल न मिळाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे पठाणी वसुली थांबवून वीजपुरवठा सुरळीत न केल्यास शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय पुन्हा रस्त्यावर उतरून अंदोलन करू.
-शांतीलाल गवळी, शेतकरी