२५ वर्षांपूर्वी भारत विठोबा आहेरकर यांनी किरण उर्फ प्रवीण शुक्राचार्य पाटील यांच्याकडून सांगोला-महूद रोडलगत ८ एकर १८ आर. इतकी जमीन खरेदी केली. सदर क्षेत्रातील वहिवाटीस शुक्राचार्य रामदास पाटील व सुहास शुक्राचार्य पाटील, किरण शुक्राचार्य पाटील यांनी हरकत अडथळा केला होता. म्हणून भारत आहेरकर यांनी त्यांच्याविरुद्ध सांगोला दिवाणी न्यायालयात केस दाखल केला होती. न्यायालयाने भारत आहेरकर यांचा अर्ज मंजूर केला होता. सदर आदेशाविरुद्ध किरण शुक्राचार्य पाटीलसह इतरांनी पंढरपूर जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायालयाने अपिलावर २८ ऑगस्ट २०१७ रोजी निशाणी नंबर १९ वर आदेश करून शुक्राचार्य पाटील वगैरे ३ यांना भारत आहेरकर यांच्या वहिवाटीस कोणत्याही प्रकारचा अडथळा करू नये म्हणून मनाई आदेश पारित केला होता.
न्यायालयाचा मनाई आदेश असतानाही किरण उर्फ प्रवीण शुक्राचार्य पाटील, सर्जेराव शंकर ढेंबर, नवनाथ मोहन शिंगाडे, काशिलिंग पांडुरंग गाडेकर, सागर ज्ञानू जानकर, विजय शिंगाडे व इतर अज्ञात २० ते २२ इसमानी गुरुवारी सायं. ८ ते रात्री ९ च्या दरम्यान भारत आहेरकर यांच्या कंपाऊंड असलेल्या शेतात बेकायदेशीरपणे घुसून शिवीगाळ दमदाटी करून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन जमिनीमध्ये अतिक्रमण करीत पिकांची नासधूस केली. याबाबत भारत विठोबा आहेरकर (रा. सांगोला) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी किरण उर्फ प्रवीण शुक्राचार्य पाटील, सर्जेराव शंकर ढेंबर, नवनाथ मोहन शिंगाडे, काशिलिंग पांडुरंग गाडेकर, सागर ज्ञानू जानकर, विजय शिंगाडे व इतर अज्ञात २० ते २२ इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.