ग्रामपंचायतीचा गावगाड्याचा कारभार पाहण्याचा प्रारंभ ॲड. गणेश पाटील यांचे पंजोबा गोपाळराव पाटील यांच्यापासून झाला. तीच परंपरा यशवंतभाऊ पाटील यांनी चालविली. वडिलांचा वारसा घेऊन पुढे राजूबापू पाटील यांनी त्याला अधिक बळ देण्याचे काम केले. त्यामुळे ग्रामपंचायत स्थापनेपासून पाटील परिवाराची निर्विवाद एकहाती सत्ता राहिली. नुकतेच कोरोनाच्या आजाराने राजूबापू पाटील व त्यांचे बंधू महेश पाटील आणि चुलते यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात राजूबापू पाटील यांचे सुपुत्र विद्यमान उपसरपंच ॲड. गणेश पाटील, चुलते रावसाहेब पाटील, भाऊ शेखर पाटील, धैर्यशील पाटील व राजूबापू पाटील यांचे खंदे समर्थक यांच्या सहकार्याने या निवडणुकीत एकहाती सत्ता राखून ठेवली.
एकूण १७ सदस्य असणाऱ्या या ग्रामपंचायतीचे ११ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. केवळ सहा जागांसाठी ही निवडणूक लागली होती. यामध्ये तीन वाॅर्डात विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
गणेश पाटील यांच्या गळ्यात पडणार सरपंचपदाची माळ
भोसे ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून पाटील परिवाराचे वर्चस्व आहे. असे असताना पाटील परिवाराने आजपर्यंतच्या कार्यकाळात प्रत्येक समाज घटकाला सत्तेत सामावून घेऊन ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्याची संधी दिली. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकहाती सत्ता कायम ठेवली. परंतु सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बुधवारी झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये सरपंचपद सर्वसाधारण झाल्याने ग्रामपंचायतीच्या कारभाराचा अभ्यास पूर्ण झालेल्या ॲड. गणेश पाटील यांच्याच गळ्यात सरपंचपदाची माळ पडणार असल्याचे सिद्ध झाले आहे.