पंढरपुरातील विकास कामासंदर्भात व मंदिरातील विकास कामासंदर्भात आढावा घेण्यासाठी आ. गोऱ्हे पंढरपूरला आल्या हाेत्या. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, संभाजी शिंदे उपस्थित होते.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या पदाधिकारी, पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी श्री विठ्ठल मंदिरातील व बाहेरील बाजूच्या विकास कामासंदर्भात आराखडा तयार करून सादर केला आहे. यावर मंदिर समितीने काही सूचना दिल्या आहेत. त्यानुसार फेरबदल करून पुन्हा त्यास पुरातत्व विभाग व मंदिर समितीची मान्यता घेऊन तो विधी व न्याय खात्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. यासाठी लागणारा निधी शासनाकडून देण्यासंदर्भात आपण प्रयत्न करणार असल्याचे गोऱ्हे म्हणाल्या.
श्री विठ्ठल मंदिराच्या विकास कामाबाबत आतापर्यंत ५ बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे अनेक कामे मार्गी लागली आहेत. यामध्ये मंदिराच्या छतावर झाडे आली होती. ती झाडे मंदिराला धोकादायक ठरणार होती. यामुळे फक्त झाडेच न काढता, झाडे आलेली दगड देखील बदलण्यात आले आहेत. मंदिर परिवार देवतांमधील अनेक देवांच्या मूर्ती भंगल्या होत्या. त्या ठिकणी दुसऱ्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसेच भक्त निवासचे काम देखील मार्गी लागले असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
-----
एकाच भाविकाकडून सर्व निधी नको
मंदिराच्या कामासाठी मंदिर समितीने सरकारकडून निधी मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. निधी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर इतर मार्गाने देखील निधी मिळविण्याबाबत चर्चा करण्यात आली. श्री विठ्ठल मंदिराच्या कामासाठी एकाच भाविकाकडून निधी घेऊ नये. जेणे करून मदत करणारा भाविक त्याचा हक्क सांगू नये, यामुळे काही टक्के मदत भाविकांकडून घ्यावी, अशा सूचनाही उपसभापती गोऱ्हे यांनी केल्या.
पद्मावती उद्यानात होऊ शकते शेगावप्रमाणे उद्यान
पंढरपुरात आलेल्या भाविकांना मनमोकळेप्रमाणे फिरता यावे, यासाठी शेगावप्रमाणे पंढरपुरात उद्यान असणे गरजेचे आहे. हे उद्यान शहरातील पद्मावती उद्यान किंवा गोपाळपूर येथे करायचे, याबाबत प्रशासनाकडून ठरवण्यात येत आहे. त्याचबरोबर नाट्यगृहाच्या राहिलेल्या कामासाठी १० कोटी निधी मिळावा अशी मागणी झाली असून, हा निधी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले.
फोटो :
पत्रकारांशी संवाद साधना विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते.
----