आॅनलाइन लोकमत सोलापूरवडवळ दि १ : राज्यातील विकास सोसायट्यांनी केवळ कर्ज वाटप करणे व वसूल करणे, हीच पारंपरिक कामे न करता गाव पातळीवर पूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करून त्याचे मार्केटिंग करावे. अशा प्रकारे राज्यात ५ हजार विकास सोसायट्यांच्या मार्फत हे धोरण राबविण्याचा आपला प्रयत्न आहे. यामुळे ग्रामीण भागातील विकासाचे चित्र नक्की बदलेल. यासाठी जिल्हा बँकांनी पुढाकार घ्यावा, आपण त्यास सर्वतोपरी सहकार्य करू, असे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी येथे सांगितले.मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय स्थलांतर व नूतनीकरण, शहीद जवान विश्वनाथ मोरे स्मारक भूमिपूजन, बजाज आॅटो व स्वयंशिक्षण प्रयोग पुणे यांचे शुद्ध पाणी प्रकल्प, १४ व्या वित्त आयोगातून विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील होते.पुढे बोलताना देशमुख यांनी उजनीच्या पाण्याचे नियोजन व ऊसदराबाबत बैठक घेण्याचे नियोजन सुरू असून पुढील पाणीटंचाई होऊ नये, यासाठी पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवणे गरजेचे आहे, असे सांगितले.जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी शेतकºयांना सरसकट कर्जमाफी हाच पर्याय योग्य आहे. यामुळे त्यांना न्याय मिळणार असून सध्या उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही शेतीला पाणी वाटपाचे नियोजन झाले नसून पिकांसाठी पाच पाण्याच्या पाळ्या सोडणे आवश्यक आहे. सध्याचे एफआरपी धोरण बदलणे गरजेचे असून एफआरपी मागील वर्षीच्या रिकव्हरीवर न देता चालू वर्षाच्या रिकव्हरीवर देणे योग्य ठरणार आहे. ग्रामीण भागातील अर्थकारण ऊस कारखानदारीवर अवलंबून आहे. जर हे साखर कारखाने उद्ध्वस्त झाले तर शेतकरी उद्ध्वस्त होतील, यासाठी शासनाने आपल्या एफआरपी धोरणात बदल करणे गरजेचे आहे, असे सांगितले.यावेळी ग्रामपंचायत व स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने प्रारंभ ग्रामीण उद्योजकता कार्यक्रम अंतर्गत बचत गटांना ५० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, जि. प. सदस्य तानाजी खताळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, सभापती समता गावडे, उपसभापती साधना देशमुख, माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, सतीश काळे, पो. नि. राजेंद्र मस्के, प्रकाश चव्हाण, सुरेश शिवपूजे, नागनाथ मोरे, दिलीप बाबर, हरिदास पवार, सचिन चव्हाण, श्रीकांत शिवपूजे, शहाजी देशमुख, देविदास लेंगरे, सरपंच स्वप्नाली लेंगरे, उपसरपंच धनाजी चव्हाण, आबा बाबर, शिवाजी साळुंखे, राजेंद्र माने, अज्ञान माने, ग्रा. पं. सदस्य साधना देशमुख, पोपट मळगे, प्रीती माने, तात्या नाईकनवरे, शाहू धनवे, नामदेव पवार, अमोल शिंदे, राहुल मोरे, सहायक प्रकल्प अधिकारी व्ही. आर. देशमुख, किरण माने, रेश्मा कांबळे, नंदकिशोर बागवाले, दशरथ मोरे उपस्थित होते. सूत्रसंचालन राजाराम बाबर यांनी केले. आभार शहाजी देशमुख यांनी मानले.---------------शहीद स्मारकासाठी ५ लाख रूपये-शहीद जवान विश्वनाथ मोरे यांच्या स्मारकासाठी जि. प. सदस्य तानाजी खताळ, अर्थ व बांधकाम समिती सभापती विजयराज डोंगरे यांनी जि. प. मधून ५ लाख रुपये तरतूद केली असून हे स्मारक आता वेळेत पूर्ण होणार आहे. -शुद्ध पाणी प्रकल्पामुळे आता दर एक तासाला १ हजार लिटर पाणी शुद्ध स्वरूपात मिळणार असून ६ रुपयांमध्ये २० लिटर पाणी आता भाविक व ग्रामस्थांना मिळणार आहे.
विकास सोसायट्यांनी पूरक व्यवसाय सुरू करावेत, सहकारमंत्री सुभाष देशमुख, वडवळ येथे विविध विकासकामांचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 4:12 PM
राज्यात ५ हजार विकास सोसायट्यांच्या मार्फत हे धोरण राबविण्याचा आपला प्रयत्न आहे. यामुळे ग्रामीण भागातील विकासाचे चित्र नक्की बदलेल. यासाठी जिल्हा बँकांनी पुढाकार घ्यावा, आपण त्यास सर्वतोपरी सहकार्य करू, असे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी येथे सांगितले.
ठळक मुद्देउजनीच्या पाण्याचे नियोजन व ऊसदराबाबत बैठक घेण्याचे नियोजन सुरूसध्याचे एफआरपी धोरण बदलणे गरजेचे असून एफआरपी मागील वर्षीच्या रिकव्हरीवर न देता चालू वर्षाच्या रिकव्हरीवर देणे योग्य ठरणार आहेग्रामीण उद्योजकता कार्यक्रम अंतर्गत बचत गटांना ५० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.