Devendra Fadnavis ( Marathi News ) : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तिकिटावर माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मोहिते पाटलांच्या या निर्णयाने माढा लोकसभा मतदारसंघात भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. भाजपचे माढ्यातील उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आज सांगोला इथं भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली. यावेळी फडणवीस यांनी पक्षांतर करणाऱ्या धैर्यशील मोहिते पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला.
मोहिते पाटलांना केलेल्या मदतीचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, " शरद पवार यांनी मोहिते पाटलांना अडचणीत आणून त्यांचं राजकारण जवळजवळ संपवलं होतं, तेव्हा आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलो होतो. मात्र आता पक्षांतराचा जो निर्णय झाला तो त्यांच्या घरातही सगळ्यांना पटलेला नाही," असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
अभिजीत पाटलांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेवर खुलासा
माढ्यात शरद पवारांनी मोहिते पाटील कुटुंबाला आपल्याकडे खेचत भाजपला धक्का दिल्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा तरुण नेता गळाला लावण्यासाठी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रयत्नशील असल्याची चर्चा सुरू आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गोडाऊनला जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेने सील केल्यामुळे अडचणीत आलेले अभिजीत पाटील हे भाजपचा वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. आज सोलापूर मुक्कामी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची अभिजीत पाटलांसोबत बैठकही होणार असल्याची चर्चा होती. तसंच फडणवीस आज आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि धैर्यशील मोहिते-पाटील यांचे विरोधक धवलसिंह यांच्या घरी जाणार असल्याने धवलसिंह मोहिते पाटील हेदेखील भाजपचं कमळ हाती घेतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र याबाबत स्पष्टीकरण देत आज या दोन्ही नेत्यांचे पक्षप्रवेश होणार नसल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं.