सोलापूर/सांगोला : तुळजाभवानी सूतगिरणी, पतंगराव कदम क्रेडिट सोसायटी, राधाकृष्ण दूध संघ व कुक्कुटपालन अशा वेगवेगळ्या संस्थांची जागा, शेअर्स, अनुदान कोठे गेले या प्रश्नांची उत्तरं शहाजीबापूंनी द्यावीत. "समदं ओक्के हाय असं म्हणणाऱ्यांनी सगळं गायब झालंय हे दाखवून किमान ढेकर तरी द्यायची होती," अशी बोचरी टीका शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. रविवारी सांगोला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी, त्यांनी भाजपच्या कपटनिटी राजकारणावर टीका करताना देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. फडणवीसच जवळच्या नेत्यांना संपवत असल्याचं त्यांनी म्हटलं.
भाजप हा पक्ष जवळ घेऊन संपवण्याचं काम करतो, भाजपने उत्तर प्रदेशात, दक्षिण भारतात ज्या पक्षांना जवळ घेतलं त्यांनाच संपवून टाकलं. भाजपचं राजकारण हे कपटनितीवर अवलंबून आहे, टीम देवेंद्रने ही कपटनिती आखली आहे, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांवर जबरी टीका केली. भाजपने आणि देवेंद्र फडणवीसांनी ज्यांना जवळ केलं, त्यांना पद्धतशीरपणे संपवलं, महाराष्ट्रात लोकनेत्या पंकजा मुंडेंना साईडलाईन केलं, तावडेंना साईडलाईन केलं होतं, पण ते तावडीतून सुटून पुढे निघून गेले. चंदक्रांत दादांवर आत्ता जे सुरू आहे, चंद्रकांत दादांसाठी ठरवून ट्रॅप टाकण्याचा डाव देवेंद्रजींचा आहे. देवेंद्रजीच चंद्रकांत पाटलांना संपविण्यासाठी आतुर झालेले आहेत, असा गंभीर आरोपही सुषमा अंधारे यांनी केला. विशेष म्हणजे मी जबाबदारीने हे बोलत असून मी सिद्ध करून दाखवने, असेही त्यांनी म्हटलं.
मी कल्याणच्या सभेत म्हटलं होतं, एकनाथभाऊ हे देवेंद्र फडणवीस तुम्हालाही गारद करणार. आता, बघा हिवाली अधिवेशनात ८३ कोटींचा भूखंड केवळ २ कोटी रुपयांना कसा विकला, हा घोटाळा कोणी बाहेर काढला. भाजपच्या तिघांनी त्यांचा हा गेम केलाय, असे म्हणत फडणवीसांनीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.
शहाजीबापूंसह २० आमदार भाजपमध्ये उड्या मारतील
शहाजीबापूंनी तालुक्यातील विकास, महागाईवर बोलावे. केवळ "काय झाडी, काय डोंगार काय हाटेल" म्हणून विकास होत नसतो, असे बोलून शहाजीबापूंनी आतापर्यंत एकही पक्ष सोडला नाही, देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना संपवल्यानंतर ४० पैकी २० आमदार भाजपमध्ये उड्या मारतील, त्यामध्ये शहाजीबापू एक असणार आहेत असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.
५० खोक्यांसाठी गेले
माझा भाऊ शहाजीबापू तालुक्याच्या विकासकामांसाठी मिळणाऱ्या निधीतून दहा, पाच टक्के घेऊन स्वतःचा विकास करीत सुटल्याचा घणाघात सुषमा अंधारे यांनी केला. शिवसेनेतून फुटून जे गद्दार गेले त्यांना ना हिंदुत्वासाठी, ना निधीसाठी, केवळ ते ५० खोक्यांसाठी गेले, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटलं.
लावा रे दादा तो व्हिडीओचा नारा
"लावा रे दादा तो व्हिडीओ," म्हणत सुषमा अंधारे यांनी आपल्या रोखठोक भाषणातून भाजपचे तथाकथित नेते, संभाजी भिडे, निवृत्ती महाराज, श्री श्री रविशंकर यांनी हिंदू देवदेवतांच्या बाबतीत बेताल वक्तव्य केल्याचे व्हिडीओ स्क्रीनवर दाखविले.