पंढरपूर/सोलापूर : गोरगरीब जनता, कष्टकरी व शेतकऱ्यांवर येणारी संकटे दूर होऊन तो सुजलाम सुफलाम व्हावा, यासाठी शक्ती आणि आशीर्वाद द्यावा, असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापुजेच्याप्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आषाढी अन् कार्तिकी एकादशीची पूजा करणारे देवेंद्र फडणवीस हे एकमेव मंत्री ठरले आहेत. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी आषाढी एकादशीची पूजा केली होती. त्यानंतर, आता उपमुख्यमंत्रीपदी असल्याने त्यांना कार्तिकी एकादशीच्या पुजेचा मानही मिळाला आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पार पडली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते त्या दोघांचा हृद्य सत्कार करण्यात आला. यावेळी महसूलमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होती. आषाढी यात्रेच्या एकादशी सोहळ्याच्या दिवशी शासकीय महापूजा करण्याचा मान मुख्यमंत्र्यांना असतो. तर कार्तिकी यात्रेची एकादशीची शासकीय महापूजा करण्याचा मान उपमुख्यमंत्र्यांना असतो. यामुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शासकीय महापूजेचे निमंत्रण देण्यात आले होते.
देवेंद्र फडणवीस यांना प्रथमच कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मिळाला. राज्यात ४ महिन्यांपूर्वी सत्तांतर झाले अन् विरोधी पक्षात असलेले देवेंद्र फडणवीस हे अनपेक्षितपणे राज्याचे उपमुख्यमंत्री बनले. यापूर्वी, २०१४ ते १९ या काळात त्यांनी ५ वर्षे राज्याचे मुख्यमंत्री बनून काम पाहिले. त्यामुळे, साहजिक मुख्यमंत्री असल्याने आषाढी एकादशीचा बहुमान त्यांना मिळत असे. तर, कार्तिकी एकादशीची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते होते. त्यामुळे, यंदा उपमुख्यमंत्री असल्याने हाही मान त्यांना मिळाला. त्यामुळेच, आषाढी अन् कार्तिकी एकादशीच्या पुजेचा मान मिळालेले ते एकमेव उपमुख्यमंत्री ठरले आहेत. हा विलक्षण योग असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनीही यावेळी बोलून दाखवलं.
तिर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम होईल
अनेक आक्रमणे होत असतानाही वारकऱ्यांनी भागवत धर्माची पताका फडकवत ठेवली. वारीचा हा अभूतपूर्व सोहळा पाहणाऱ्याच्या डोळ्यांचे पारणे फिटते. हा सोहळा वृद्धिंगत व्हावा, अशी आपणा सर्वांची अपेक्षा आहे, असे सांगून फडणवीस म्हणाले, पंढरपूर वारीच्या सर्व परंपरा अखंडित ठेऊन वारकरी संप्रदायाची परंपरा पाळून, स्थानिकांना विश्वासात घेऊन, कोणाचेही नुकसान न करता, कोणालाही विस्थापित न करता, अधिग्रहीत केलेल्या जागेचा योग्य मोबदला संबंधितांना देऊन, पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम करण्यात येईल