राकेश कदम. साेलापूर : माढा लाेकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या मतदारसंघात राेज नवे राजकीय डाव टाकले जात आहे. फडणवीस यांची रविवारी अकलूजच्या विजय चाैकात जाहीर सभा हाेणार आहे. ही सभा झाल्यानंतर फडणवीस पवार गटाचे उमेदवार धैर्यशील माेहिते-पाटील यांचे विराेधक तथा काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह माेहिते-पाटील यांच्या निवासस्थानी चहापान घेण्यासाठी जात आहेत.
माढा लाेकसभा मतदारसंघातील निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. धैर्यशील यांनी भाजप साेडून पवार गटाची उमेदवारी घेतली. माढा, माळशिरस, फलटण भागातील भाजपचे कार्यकर्त्यांचे पवार गटात प्रवेश हाेउ लागले. अजितदादा गटाचे नेते उत्तम जानकर यांनीही भाजपला जाहीर आव्हान दिले. यापार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी नवी जुळवाजुळव सुरू केली आहे. माळशिरस विकास आघाडीच्या नेत्यांसाेबत नुकतीच त्यांनी बैठक घेतली. या नेत्यांनी भाजपसाेबत जाण्याचा निर्णय घेतला. आता फडणवीस थेट आमदार रणजितसिंह माेहिते-पाटील आणि धैर्यशील माेहिते-पाटील यांचे विराेधक धवलसिंह यांच्या घरी जाणार आहेत.धवलसिंह हाेते गायब
काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह माेहिते-पाटील यांच्यावर अकलूज पाेलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. धवलसिंह यांनी या प्रकरणातील आराेप फेटाळले हाेते. उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द केल्यामुळे ते प्रचारापासून दूर हाेते. मात्र ते रविवारी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत करणार आहेत.