सोलापूर : कार्तिकी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेला दोन्ही उप मुख्यमंत्र्यांपैकी कोणाला बोलवायचे, याबाबत मंदिर समितीने शासनाच्या विधि व न्याय विभागाकडून अभिप्राय मागितला होता; मात्र अद्यापही उत्तर न मिळाल्याने मंदिर समितीसमोरचे कोडे कायम आहे. त्यामुळे यंदाच्या महापूजेला देवेंद्र फडणवीस येणार की अजित पवारांना संधी मिळणार, याची उत्सुकता कायम आहे.
२३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. आषाढीला मुख्यमंत्री, तर कार्तिकीला महापूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांना दिला जातो. सध्या दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे मागील महिन्यात मंदिर समितीच्या बैठकीत विधि व न्याय विभागाकडून अभिप्राय घेऊनच निमंत्रण देण्याचे ठरले होते.त्यानुसार मंदिर समितीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहारही केला; मात्र अद्याप उत्तर आलेले नाही.
सध्या दोन उपमुख्यमंत्री असल्यामुळे कार्तिकीच्या शासकीय महापूजेसाठी कोणाला बोलवायचे, याबाबत विधि व न्याय विभागाला पत्र पाठविले आहे. उत्तर आल्यानंतर निमंत्रण देण्यात येईल. - गहिनीनाथ औसेकर महाराज, सहअध्यक्ष, मंदिर समिती